पुण्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणुक सध्या चांगलीच चर्चेत आहे. प्रत्येक पक्ष जोमाने निवडणुकीसाठी प्रचार करताना दिसत आहे. आपला मतदारसंघ राखण्यासाठी भाजपाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. यासाठी भाजपाने गिरीश बापटांना प्रचार रिंगणात उतरवले आहे. या पोट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी युवा उद्योजक आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख पुनीत बालन यांची भेट घेतली.
कसबा पोटनिवडणुकीत आज ‘हे’ उमेदवार चक्क प्रचार करणार नाहीत; कारण…
कसबा पोटनिवडणूक भाजपासाठी प्रतिष्ठेची बनली आहे. त्यासाठी भाजपाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नांचा भाग म्हणून फडणवीसांनी पुनीत बालन यांची भेट घेतल्याचं म्हटलं जातंय. फडणवीसांनी आमदार सिदार्थ शिरोळे यांच्या निवासस्थानी काही महत्वाच्या निवडक व्यक्तीशी भेट घेऊन चर्चा केली. यात उद्योजक बालन यांच्याशीही २०-२५ मिनिटे चर्चा केल्याचं समोर आलंय.
कसबा मतदारसंघातील दीडशेहून अधिक गणेश मंडळांना पुनीत बालन ग्रुपच्या माध्यमातून मोठी आर्थिक मदत करण्यात आली होती. या मदतीमुळे करोनाच्या साथीनंतरचा गणेशोत्सव मंडळांना चांगल्या पद्धतीने साजरा करू शकले होते. या मदतीमुळे गणेश मंडळाचे कार्यकर्ते बालन यांच्याशी जोडले गेले आहेत. त्यामुळे बालन यांची या पोट निवडणुकीतील भूमिका महत्त्वाची ठरू शकते, या दृष्टीने ही भेट घेतली गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.