छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचेच आदर्श आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनाही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची माहिती आहे. त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. महाराष्ट्र पोलीस दलाच्यावतीने रामटेकडी येथील राज्य राखीव पोलीस बल गट येथे ‘अखिल भारतीय पोलीस रेसलिंग क्लस्टर स्पर्धा २०२२’ चे आयोजन केले होते. या स्पर्धेचा समारोप प्रसंगी पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी हा आरोप केला आहे.
हेही वाचा- गतिमान वृत्तांकनात बातमीतील सत्यता राखण्याचे पत्रकारांपुढे आवाहन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य तसेच शौर्याची माहिती देशतील सर्वांना आहे. राज्यपालांनाही त्यांची माहिती आहे. त्यांच्या विधानाचा विपर्यास करून विनाकारण वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही फडणवीस म्हणाले.
हेही वाचा- पिंपरी-चिंचवडच्या लघुउद्योजकांनी उद्योगमंत्र्यांसमोर वाचला समस्यांचा पाढा
पोलीस दलातील बदल्याविषयी नाराजी असल्याचा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्या नियमांना धरुनच केल्या आहेत.पुण्यात राज्य पोलीस क्रीडा प्रशिक्षण संस्था सुरू करण्याचा प्रस्ताव विचाराधिन आहे. आम्ही सत्तेत असताना हा प्रस्ताव मार्गी लावण्यात येणार होता. मात्र करोना संसर्गमुळे या प्रस्तावाला काही प्रमाणात विलंब झाला. आता पुण्यात अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे. लवकरच याचे काम सुरू होईल, असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.