महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उद्योग पळवण्यासाठी आल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे. या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. देशात कोणालाही उद्योग आकृष्ट करण्यासाठी, उद्योगांची परिषद आयोजित करण्यासाठी मुंबईत येण्याशिवाय पर्याय नाही, ही मुंबई आणि महाराष्ट्राची ताकद आहे. कोणीही कितीही बोलले तरी भारताची आर्थिक राजधानी मुंबईच आहे, अशी स्पष्ट भूमिका पमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात मांडली.
पुणे दौऱ्यावर असलेल्या फडणवीस यांनी एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. कोणीही कोणाचा उद्योग पळवून नेऊ शकत नाही. महाराष्ट्रातील उद्योग कोणीच पळवून नेऊ शकत नाही. आपली एक मोठी शक्ती आहे. प्रत्येक राज्याची ताकद असते, भौगोलिक परिस्थिती असते, काही नैसर्गिक फायदे असतात. त्यानुसार काही उद्योग जात असतात. उदाहरणार्थ, गुजरात, राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात वाळवंट असल्याने त्यांच्याकडे जमिनीची उपलब्धबता आहे. तीन-चार लाख एकर जमीन सोलर पॅनलसासाठी उपलब्ध होते. त्यामुळे ग्रीन हायड्रोजनसारखे उद्योग तिकडे जातात. तेवढी जमीन कदाचित आपल्याकडे उपलब्ध होऊ शकत नाही. त्यामुळे कोणीही कितीही बोलले तरी भारताची आर्थिक राजधानी मुंबईच आहे, अशी स्पष्टोक्ती फडणवीस यांनी केली.
हेही वाचा- अजित पवारांकडे काही तालुक्यांची सूत्रे द्या, शरद पवार यांच्याकडे कार्यकर्त्यांची मागणी
मुंबई पोलीस आयुक्तांना अधिनस्त दोन आयुक्त
मुंबईच्या पोलीस आयुक्त पदाला महासंचालक पदाचा दर्जा मी मुख्यमंत्री झाल्यावर देण्यात आला. त्यानंतर सहायक पोलीस महासंचालक दर्जाचे पद तयार करता आले नव्हते. त्यामुळे मुंबईत तयार करण्यात आलेल्या दोन पोलिस आयुक्त पदांना विशेष आयुक्त असे नाव असले तरी ते मुंबईच्या पोलिस आयुक्तांनाच अधिनस्त पद आहे. त्यामुळे खूप काही वेगळे केलेले नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.