पुणे : राज्यात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तर महाविकास आघाडीला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. यामध्ये अनेक धक्कादायक निकाल लागले. त्यामध्ये पुण्यातच नव्हे तर राज्याच्या राजकारणात चर्चेत राहिलेले कसबा विधानसभा मतदार संघाचे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांना पराभवाला सामोरे जावे लागले. या निवडणुकीत भाजपचे नेते माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने हे प्रचंड मताधिक्याने निवडून आले.
कसबा विधानसभा मतदार संघाचे हेमंत रासने आमदार झाल्यानंतर चांगलेच अॅक्टिव्ह झाले असून आज पुणे महापालिकेतील अधिकारी वर्गांसोबत मतदार संघातील पाहणी दौरा केला. त्या पाहणी दौर्यानंतर हेमंत रासने यांनी प्रसार माध्यमाशी संवाद साधला असता ते म्हणाले की, विधानसभा निवडणुकी दरम्यान जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यानुसार कचरा मुक्त कसबा ही मोहीम हाती घेण्यात आली असून आज सकाळी सात वाजल्यापासून मतदार संघातील अनेक भागात अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली. त्याबाबत आवश्यक त्या सूचना केल्या आहेत आणि ते आठ दिवसात अहवाल देतील, त्यानंतर आमची पुन्हा एकदा बैठक झाल्यावर कसबा मतदार संघ कचरा मुक्त करण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे जाणार आहोत. या उपक्रमात नागरिकांनी अधिकाधिक सहभागी व्हावेत. या उपक्रमासाठी काही सूचना कराव्यात, असे आवाहन देखील त्यांनी केले.
आणखी वाचा-पुण्यात होणार नव्याने प्रभाग रचना, काय आहे कारण ?
मुख्यमंत्री पदासाठी अनेकांची नाव चर्चेत आहेत. त्या प्रश्नावर ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि महायुतीमधील प्रमुख नेतेमंडळी मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय घेतील, पण मी एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे माझे नेते देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, हीच इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.
© IE Online Media Services (P) Ltd