आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात महायुती, महाविकास आघाडी,मनसे आणि अन्य पक्षाच्या सभा,मेळावे,रॅली काढून मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करित आहे. या दरम्यान एकमेकांवर आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळत आहे. त्याच दरम्यान आज पुण्यातील कसबा विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार भाजपचे नेते हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा कसबा मतदार संघात सभा पार पडली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचा भाषणातून चांगलाच समाचार घेतल्याचे पाहण्यास मिळाले.
यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की,आपल्या देशात काही वर्षांपूर्वी एक सिनेमा आला होता. तो म्हणजे ॲक्सिडेंटल पीएम त्यानुसार मागील निवडणुकीत कसबा विधानसभा मतदार संघात एक ॲक्सिडेंटल आमदार तयार झाला. हा ॲक्सिडेंटल आमदार काम कमी आणि दंगे जास्त,काम कमी आणि नाटक जास्त,त्यामुळे या आमदाराला रंगभूमीवर नेल असत तर, तो मी नव्हेच हे पात्र खूप सुंदर प्रकारे साकारल असत,अशा शब्दात महाविकास आघाडीचे उमेदवार काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार रविंद्र धंगेकर यांना टोला लगावला.आता या टीकेला रविंद्र धंगेकर कशा प्रकारे प्रत्त्युत्तर देतात,हे पाहणे जरुरीचे ठरणार आहे. तसेच ते पुढे म्हणाले की, राज्यात महायुतीच सरकार आल्यावर अनेक योजना आणल्या आणि त्या प्रत्येक योजनेला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्याबाबत सांगायचे झाल्यास,लेक लाडकी योजना अंतर्गत मुलींच्या जन्माचे स्वागत सुरू केले.उच्च शिक्षणासाठी मोठी फी आकारली जाते.
हेही वाचा >>> कल्याणीनगर अपघात प्रकरणात दोन आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल
पण राज्य सरकारने मध्यम वर्ग आर्थिक स्थिती मजबुरीमुळे फी भरू शकत नाही. त्या मुलींना आम्ही शिक्षणासाठी मदत देऊ केली. तसेच एसटी प्रवासात महिलांना निम्मे तिकीट दर आकारले. त्यामुळे तोट्यात असलेली एसटी महामंडळ नफ्यात आले.त्याच दरम्यान मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेंतर्गत महिलांना १५०० रुपये देण्याचा निर्णय घेतला. त्या योजनेला महिला वर्गाने प्रचंड प्रतिसाद दिला असून आम्ही योजना सुरू केल्यापासून प्रत्येक हप्ता दिला आहे.तो जवळपास साडेसात हजार रुपये त्यांच्या बँक खात्यावर जमा झाले.पण काही सावत्र भाऊ या योजने विरोधात न्यायालयात गेले आणि विरोधात योजना बंद करण्यासाठी याचिका टाकली,या योजनेवरून विरोधकांनी टीका करण्याच काम केले.पण आम्ही आमचे काम करीत राहिलो आहे. त्यामुळे आता नव्याने महायुतीच सरकार आल्यावर महिलांना २१०० रुपये दर महिना दिले जाणार असून भावांसाठी देखील आम्ही कौशल्य आणि भत्ता योजना सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.