केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह दिले आहे. या चिन्हाच्या अनावरणाचा सोहळा राष्ट्रवादीकडून किल्ले रायगडावर ठेवण्यात आला होता. या सोहळ्यासाठी तब्बल ४० वर्षांनंतर शरद पवार रायगड किल्ल्यावर गेले. यावरुन आता भाजपा आणि मनसेने शरद पवारांवर उपरोधिक टीका केली आहे. पुण्यात माध्यमांशी बोलत असताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मला एकाच गोष्टीचा आनंद वाटतो की, ४० वर्षांनंतर शेवटी शरद पवार रायगडावर गेले. अजित पवारांना याचे श्रेय द्यावेच लागेल. ४० वर्षांनंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नमन करण्यासाठी जावं लागलं.”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुतारी कुठे, कशी वाजते हे पाहूच

अजित पवार यांच्यामुळे अखेर शरद पवार यांना रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नमन करण्यासाठी जावं लागलं, याचा आनंद वाटतो असे सांगताना देवेंद्र फडणवीस यांनी तुतारी चिन्हावर भाष्य केलं. तुतारी कुठे, कशी वाजते? हे भविष्य काळात दिसेलच, असेही ते म्हणाले.

“छत्रपतींचं नाव घेतल्यामुळे मुस्लिमांची मतं…”, शरद पवार रायगडावर गेल्यानंतर राज ठाकरेंचं मोठं विधान

पुण्यात गेल्या काही दिवसांत हजारो कोटींचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. याबाबत माहिती देताना उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “पुणे पोलिसांचे अभिनंदन करायला हवे. पोलिसांनी अतिशय शिताफीने अमली पदार्थांचा साठा शोधून काढला आहे. सरकारकडून ‘झिरो ड्रग्ज पॉलिसी, नो टोलरन्स फॉर ड्रग्ज’ असे धोरण आखले आहे. केवळ मुद्देमाल पकडून थांबू नका, तर त्याही पुढे जाऊन त्याच्यापाठी असलेल्यांना शोधून काढण्याचे आदेश गृहखात्याने दिले होते. नेमकं ते काम पोलिसांनी केलं. त्यामुळे पुण्यात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचा साठा मिळाला. पुणे पोलीस आता केंद्राच्या नार्कोटिक्स विभागाबरोबर काम करून आणखी खोलात जाऊन तपास करणार आहेत. अनेक राज्यात अमली पदार्थाविरोधी कारवाई करणे आवश्यक आहे. पुणे पोलिसांच्या यशामुळे देशभरातील कारवायांना बळ मिळणार आहे.”

तुतारी चिन्हाचं रायगडावर अनावरण, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “रणशिंग फुंकायला…”

जागावाटपावर योग्य वेळी निर्णय जाहीर करू

“महायुतीमध्ये जागावाटपाची योग्य पद्धतीने चर्चा सुरू आहे. आमची एक बैठक झालेली असून आणखी एक बैठक घेतली जाणार आहे. आम्ही लवकरच जागावाटपावर निर्णय जाहीर करू”, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी जागावाटपासंदर्भात बोलताना दिली. तसेच राहुल नार्वेकर आणि नारायण राणे यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे. यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, जागा वाटपाची चर्चा माध्यमात होत नसते. आम्ही तीन पक्ष मिळून त्याबाबतचा निर्णय जाहीर करू.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis take dig on sharad pawar over tutari symbol and raigad programe kvg