पुरंदर हवेली मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार विजय शिवतारे यांना विक्रमी मतांनी निवडून द्या. उद्धव ठाकरे यांच्याकडे शिफारस करून मी त्यांना कॅबिनेट मंत्री करतो, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिली.
सासवड येथे शिवतारे यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. ते म्हणाले, की गुंजवणीचे पाणी आणण्यासाठी शिवतारे यांनी गेली पाच वर्षे प्रयत्न केले. मात्र, जलवाहिनीची निविदा काढल्यानंतर विरोधकांनी न्यायालयात जाऊन हे काम रोखले असून, त्यांना धडा शिकवा. निवडणूक झाल्यानंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये हे काम पूर्ण करणारच. शेतकऱ्यांवर अन्याय न करता त्यांना विश्वासात घेऊन छत्रपती संभाजीराजे विमानतळाचे काम लवकर सुरू करणार आहोत. पुरंदरचा कायापालट करण्यासाठी सत्ताधारी पक्षाचा मंत्री निवडून द्या.
‘आघाडीचे उमेदवार तालुक्यात दादागिरीचे वातावरण तयार करत आहेत. मात्र, मी केलेली कामे पाहून मोठय़ा मताधिक्याने मतदार विजयाची हॅट्रिक करतील’, असा विश्वास शिवतारे यांनी या वेळी व्यक्त केला. बाबाराजे जाधवराव, माजी आमदार संभाजी कुंजीर, पंडित मोडक, जालिंदर कामठे, संगीताराजे निंबाळकर, शंकर हरपळे, गिरीश जगताप, राजेंद्र जगताप, दिलीप यादव, सचिन लंबाते आदी या वेळी उपस्थित होते.