हमीद दाभोलकर यांची टीका
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास जलदगतीने लावावा या मागणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घडवून आणावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मात्र, ही भेट घडवून आणण्यामध्ये मुख्यमंत्री अपयशी ठरले आहेत, अशी टीका महाराष्ट्र अंनिसचे राज्य संघटक डॉ. हमीद दाभोलकर यांनी गुरुवारी केली.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) अधिकाऱ्यांना धमक्या आल्या आहेत, याकडे लक्ष वेधले असता दाभोलकर म्हणाले, सीबीआयच्या अधिकाऱ्याला धमकी दिली जात असेल तर, सर्वसामान्य माणसाच्या रक्षणाचे काय हा प्रश्न उपस्थित होतो. या हत्येबाबत आमचा ज्यांच्यावर संशय आहे त्याच प्रवृत्तींचा केंद्रीय तपासी अधिकाऱ्याला धमकावण्यापर्यंत मजल गेली आहे. अशा परिस्थितीमध्ये सामान्य माणसाची काय गत होईल, अशी शंका वाटते.
सीबीआय आणि विशेष तपास दलाच्या (एसआयटी) तपासासंदर्भात दर १५ दिवसांनी माहिती देण्यात यावी. त्याचप्रमाणे हा तपास जलदगतीने व्हावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांना नुकतीच भेटून करण्यात आली
आहे. ही माहिती देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचेही दाभोलकर यांनी सांगितले.
कोल्हापूरमध्ये शनिवारी युवा संकल्प मेळावा
आंतरजातीय विवाह केला म्हणून भावानेच बहिणीचा तिच्या पतीसह खून करणे ही राजर्षी शाहूमहाराजांच्या कोल्हापूरमध्ये घडलेली गोष्ट निंदनीय असून अंनिस त्याचा निषेध करीत असल्याचे हमीद दाभोलकर यांनी स्पष्ट केले. जात ही कोणतीही वैज्ञानिक आधार नसलेली अंधश्रद्धा आहे, अशी मांडणी समिती सातत्याने करीत असून आंतरजातीय विवाहांना पाठबळ देण्याचे काम गेली १५ वर्षे करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर येथील खैबर कॉलेजमध्ये शनिवारी (२६ डिसेंबर) युवा संकल्प मेळावा घेण्यात येणार आहे. हरियानाच्या धर्तीवर आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना संरक्षण देण्याची योजना राज्य सरकारने महाराष्ट्रात राबवावी, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.