राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शनिवार) शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या कुटुंबीयांची पुण्यातील पर्वती येथील घरी जाऊन आज भेट घेतली. यानंतर माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी, “मला असं वाटतं की तमाम शिवप्रेमींचं हे स्वप्न आहे आणि ही जबाबदारी देखील आहे की, एक जागतिक दर्जाची शिवसृष्टी ही तयार झाली पाहिजे.” असं बोलून दाखवलं.
पुरंदरे कुटुंबीयांच्या भेटीनंतर फडणवीसांशी माध्यमांनी संवाद साधत बाबासाहेब पुरंदरेंच्या मनातील शिवसृष्टीबाबत प्रश्न विचारला असता, फडणवीस म्हणाले, “शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार, त्यांची सेवा करत करत प्रत्येक व्यक्तीपर्यंत आणि विशेषता युवकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला आणि आता ते निघून गेल्यानंतर, त्यांनी जे स्वप्न बघितलं होतं की अतिशय उत्तम प्रकारची शिवसृष्टी तयार झाली पाहिजे. ते त्यांनी हाती घेतलेलं काम हे अपूर्ण आहे, हे कोणा एका व्यक्तीचं काम नाही, यासाठी संपूर्ण समाजाला उभं राहावं लागेल. आम्ही लोक आपल्यापरीने ही शिवसृष्टी पूर्ण करण्याकरिता जी काही आमच्यापरीने मदत करता येईल, ती निश्चितपणे करू. पण मला असं वाटतं की तमाम शिवप्रेमींचं हे स्वप्न आहे आणि ही जबाबदारी देखील आहे की, एक जागतिक दर्जाची शिवसृष्टी ही तयार झाली पाहिजे.”
ठाकरे सरकारच्या दोन वर्षातील कामगिरीबाबत फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
तसेच, उदयनराजे भोसले यांनी अशी मागणी केलेली होती की, केंद्र आणि राज्य सरकारने मिळून या शिवसृष्टीसाठी आर्थिक मदत करणे गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही काय पाठपुरवा करणार आहात का? यावर फडणवीस म्हणाले, “जेव्हा आमचं सरकार होतं त्यावेळेस आम्ही, त्या शिवसृष्टीला एक दर्जा दिलेलाच आहे. त्यामुळे आता केंद्राला किंवा राज्याला विशेषता मदत करायची असेल तर त्यात कुठली अडचण नाही. मला असं वाटतं की त्याला मदत करण्यास कुणाची ना देखील नसेल, त्यामुळे जरूर त्यांची मदत देखील आपण घेऊयात.”