पुणे : देवगड हापूस आंब्याच्या नावाने बाजारात मोठ्या प्रमाणात बनावट आंब्यांची विक्री केली जाते. ग्राहंकाची फसवणूक रोखण्यासाठी आता प्रत्येक देवगड हापूस आंब्याला ‘टँपर-प्रूफ यूआयडी सील’ (टी. पी. सील यूआयडी) सक्तीचे करण्याचा निर्णय देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेने घेतला आहे.
देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेचे संचालक सदस्य ॲड. ओंकार सप्रे यांनी मंंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते. सप्रे म्हणाले, ‘आंब्यावर लावलेल्या टी. पी. सील यूआयडी कोडवरून खरा देवगड हापूस ओळखता येणार आहे. भौगोलिक मानांकन (जीआय) नोंदणी असलेल्या शेतकऱ्यांनाही या तंत्रज्ञानाचा फायदा होईल.’
‘देवगड तालुक्यातील आंबा उत्पादक सहकारी संस्थेतर्फे जीआय नोंदणी असलेल्या शेतकऱ्यांना झाडांची संख्या आणि उत्पादन क्षमतेनुसार टी. पी. सील यूआयडी स्टिकर्सचे वितरण करण्यात आले आहे. या प्रणालीत शेतकऱ्यांनी बाजारात पाठविलेल्या प्रत्येक देवगड हापूस आंब्यावर हा यूआयडी स्टिकर लावणे बंधनकारक असेल,’ असेही सप्रे यांनी स्पष्ट केले.
कसा ओळखायचा देवगड हापूस?
– खरेदी करत असलेला आंबा देवगड हापूसच आहे का, हे तपासण्यासाठी ग्राहकांना ९१६७६६८८९९ या व्हाॅट्सॲप क्रमांकावर आंब्यावर असलेल्या स्टिकरचा फोटो पाठवावा लागेल.
– प्रत्येक स्टिकर दोन भागांत विभागलेले असून, यूआयडी कोडचा एक भाग स्टिकरच्या वर आणि दुसरा भाग स्टिकरच्या खाली दिसेल.
– स्टिकरवर असलेला कोड स्वयंचलित प्रणालीच्या माध्यमातून वाचला जातो.
– ही प्रणाली ग्राहकाला स्टिकरच्या मागे असलेल्या क्रमांकाची मागणी करते. त्यानंतर जर ग्राहकाने दिलेला क्रमांक प्रणालीत असलेल्या यूआयडी कोडशी जुळला, तर स्टिकर असलेला आंबाच खरा देवगड हापूस असल्याचे प्रमाणित होईल.
– ग्राहकाला शेतकरी, विक्रेत्याचे नाव, मूळ गाव, जीआय नोंदणी क्रमांक असा तपशीलही देण्यात येईल.
जीआय नोंदणी शिवाय आणि युआयडी स्टीकर असल्याशिवाय देवगड हापूस च्या नावाने विक्री करताना कोणी आढळल्यास जीआय कायदा १९९९ आणि भारतीय न्याय संहिता २०२३ च्या तरतुदींच्या अंतर्गत दखलपात्र गुन्हा आहे.
व्यापारी, दलाल आणि किरकोळ विक्रेते यांनी तोतयागिरी आणि बनावट विक्री करण्यापासून दूर राहावे असे आवाहन संस्थेने केले आहे. जीआय नोंदणी नसलेले आणि ‘टँपर प्रूफ युआयडी सील’ स्टिकर नसलेले कोणीही ‘देवगड हापूस’ च्या नावाने विक्री करताना आढळल्यास त्यांच्या विरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील संस्थेने दिला आहे.