पिंपरी : जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज वैकुंठगमन सोहळ्याच्या त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त उद्या रविवारी (दि.१६ मार्च ) होणा-या तुकाराम बिजेच्या सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोप-यांतून भाविक दाखल झाले आहेत. या सोहळ्याच्या अनुषंगाने देहूनगरीत येणाऱ्या भाविक वारकऱ्यांना सोयी-सुविधा पुरवण्यासाठी नगरपंचायत प्रशासन, शासकीय यंत्रणाकडून तयारी पूर्ण करण्यात आली आहे. टाळ-मृदुंगाचा गजर आणि ज्ञानोबा-तुकोबाचा जप करीत राज्यभरातून  दिंड्या देहूनगरीत दाखल झाल्या आहेत. त्यामुळे इंद्रायणी नदीचा काठ वारक-यांच्या गर्दीने फुलून गेला आहे.

बीज सोहळ्याच्या दिवसाची सुरुवात पहाटे तीन वाजता काकड आरतीने होईल. पहाटे चार वाजता शीळा मंदीर महापुजा विश्वस्त, अध्यक्ष मंडळ, वारकरी यांच्या हस्ते होईल. पहाटे सहा वाजता वैकुंठस्थान महापुजा, सकाळी साडेदहा वाजत पालखी प्रस्थान वैकुंठस्थान मंदीराकडे होईल. नंतर सकाळी दहा वाजता देहूकर महाराज यांचे वैकुंठ सोहळा किर्तन, दुपारी साडेबारा वाजता मुख्य मंदीरात पालखीचे आगमन होणार आहे.

देहू नगरपंचायत प्रशासनाकडून विविध कामे करण्यात आली असून पाणीपुरवठा स्वच्छतासाठी सज्ज आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने गाथा मंदिर, मुख्यमंदीर, वैकुंठस्थान मंदिर, मुख्य कमान, बीएससी केंद्रामध्ये बाह्य रुग्ण तपासणी केंद्र उभारण्यात आले असून मुबलक औषध साठा उपलब्ध करण्यात आला आहे. लाखो वारकऱ्यांच्या सोयी सुविधा आणि सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे मुख्य मंदिर वैकुंठ गमन स्थान मंदिर परिसर, तसेच नगरपंचायत प्रशासनाकडून सुमारे 30 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात आले आहेत. देहूमध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व मार्ग बीज सोहळ्यासाठी बॅरिकेटिंग उभारून बंद करण्यात आले आहेत.

तगडा पोलीस बंदोबस्त

एक पोलीस उपायुक्त, एक सहायक पोलीस आयुक्त, १५ पोलीस निरीक्षक, ५० पोलीस अधिकारी, २६८ पोलीस अंमलदार, एक एसआरपीएफ कंपनी, आरसीपी पथक, एनडीआरएफ पथक, तीन बॉम्ब शोधक नाशक पथक तैनात करण्यात आले आहे. यासह वाहतूक शाखेकडून एक पोलीस उपायुक्त, दोन सहायक पोलीस आयुक्त, दहा पोलीस निरीक्षक, २२ पोलीस अधिकारी, १६३ पोलीस अंमलदार, ६० वार्डन असा तगडा बंदोबस्तात तैनात करण्यात आला आहे.

पदपथ, रस्त्यांवर व्यवसायास बंदी; पोलीस आयुक्तांचे आदेश

बीज सोहळ्यासाठी  राज्यभरातून भाविक-वारकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी देहूनगरीत झाली आहे. सोहळ्यानिमित्त पदपथावर तसेच रस्त्यांवर फळे, फुल विक्रेते, खेळणी व इतर साहित्य, खाद्यपदार्थ विक्रेते हातगाड्या लावून, तसेच रस्त्यांवरील जागा अडवून विक्री व्यवसाय करतात. त्यामुळे रस्ता अरुंद होऊन चेंगराचेंगरी घडण्याच्या शक्यता आहे. पाकीट, मोबाईल, दागिन्यांची चोऱ्या घडण्याच्या घटनाही घडतात.

भाविकांच्या सोयी सुविधा व सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी बीज सोहळ्यासाठी दोन दिवसांसाठी पदपथांवर आणि रस्त्यांवर व्यवसाय करणाऱ्यांना बंदी करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने श्री संत तुकाराम महाराज मंदिर परिसर, वैकुंठ मंदिर परिसर, देहुगाव मुख्यकमान (प्रवेशद्वार) ते १४ टाळकरी कमान, मुख्यमंदीर ते १४ टाळकरी कमान मार्गे वैकुंठगमन मंदिर ते भैरवनाथ चौक दरम्यान पूर्णपणे बंदी करण्यात आली आहे. तसे आदेशही देण्यात आले आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यवसायधारकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही पोलीस आयुक्तांनी दिला आहे.