प्रकाश खाडे
‘येळकोट-येळकोट जय मल्हार’ असा जयघोष करीत भाविकांनी पालखी सोहळ्यावर पिवळ्याधमक भंडाऱ्याची मुक्त उधळण केल्याने साऱ्या खंडोबा गडाला सोनेरी झळाळी आली आणि देवा तुझी सोन्याची जेजुरी या उक्तीचा सर्वांना अनुभव आला. महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेला सुमारे चार लाख भाविकांनी हजेरी लावली. करोनाच्या काळामुळे दोन वर्षे सोमवती यात्रा भरली नव्हती त्यामुळे ३० मे रोजी सोमवती अमावस्या यात्रेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने भाविक जेजुरीत आले.
रविवारपासूनच जेजुरी भाविकांच्या गर्दीने फुलून गेली होती. सोमवारी सकाळी ११ वाजता ऐतिहासिक खंडोबा गडामध्ये पालखी प्रस्थान सोहळा झाला. या वेळी मुख्य पेशवे इनामदार यांनी हुकूम देताच विविध पारंपरिक वाद्यांच्या निनादात खंडोबा देवाची पालखी कऱ्हा स्नानासाठी निघाली. पालखीत श्री खंडोबा – म्हाळसा देवीच्या उत्सव मूर्ती ठेवल्यावर पालखी सोहळा पुढे सरकू लागला ,या वेळी भाविकांनी भंडाऱ्याची प्रचंड उधळण केली. दुपारी चार वाजता कऱ्हा नदीवरील पापनाशन कुंडातील पाण्याने खंडोबा म्हाळसा -देवीच्या उत्सव मूर्तीला विधियुक्त स्नान घालण्यात आले. या वेळी हजारो भाविक उपस्थित होते. स्नान झाल्यावर रात्री नऊ वाजता पालखीने पुन्हा खंडोबा गडामध्ये प्रवेश केला, या वेळी खांदेकरी -मानकरी व ग्रामस्थांना रोजमारा (ज्वारी धान्य) वाटल्यानंतर तब्बल दहा तासांनी सोमवती यात्रेची सांगता झाली.
जेजुरीत खंडोबाला लागणाऱ्या भंडार खोबऱ्याचा भाव यंदा दोनशे ते अडीचशे रुपये किलो होता. जेजुरी पोलिसांनी वाहतुकीचे योग्य नियोजन केल्याने गावात वाहनांची गर्दी झाली नाही. चारचाकी वाहनांना गावात प्रवेश बंदी होती. भाविकांना रस्त्याने व्यवस्थित चालता आले. एसटीकडून जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या. दोन वर्षांनी जेजुरीला यात्रेसाठी यायला मिळाले हा आनंद भाविकांच्या चेहऱ्यावर जाणवला. कडक उन्हाची पर्वा न करता भाविक मोठ्या उत्साहाने गड चढताना दिसले. पालखी सोहळ्यासाठी खंडोबा देवस्थानचे मुख्य विश्वस्त तुषार सहाणे व इतर विश्वस्त उपस्थित होते.
गडाच्या मुख्य महाद्वारात भाविकांची चेंगराचेंगरी
सकाळी दहानंतर भाविक खंडोबा गडावर पालखी सोहळ्यासाठी जाताना गडाच्या मुख्य महाद्वारात मोठी चेंगराचेंगरी झाली. सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. मात्र, भाविक या प्रकाराने घाबरून गेले होते. यात्रा काळात या ठिकाणी गर्दीचे नियोजन होण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.
खंडोबाची दिवटी बुधली महागली
सध्या बाजारात पितळे, तांबा, चांदी, रूपे आदी धातूंचे दर कडाडल्याने त्याचा परिणाम देवांच्या तांबे व पितळी धातूच्या मूर्ती व प्रामुख्याने देवाची दिवटी -बुधली यावर झाला. यांचे दर ४० टक्क्यांनी वाढले होते, तरीसुध्दा भाविकांनी देवांचे चांदीचे टाक, मूर्ती, दिवटी – बुधली यांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली.