पुणे : विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यानिमित्त पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी शनिवारी बंदोबस्ताचा आढावा घेतला. पुणे पोलीस आयुक्यालयात आयेजित करण्यात आलेल्या बैठकीत शुक्ला यांनी पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. भीमा कोरेगाव येथे एक जानेवारी रोजी विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
हेही वाचा >>> पुणे : ‘माननीयां’साठी ३८ कोटींच्या निधीचे वर्गीकरण! समाविष्ट गावांसाठीची तरतूद बाणेर-बालेवाडीसाठी वळविली
विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यानिमित्त आंबेडकरी चळवळीतील अनुयायी मोठ्या संख्येने राज्याच्या वेगवेगळ्या भागातून येतात. या भागातील होणारी गर्दी, नियोजन, अभिवादन सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी ठेवण्यात येणारा बंदोबस्त, वाहतूक बदल, वाहने लावण्याची व्यवस्था, याबाबतची आढावा बैठकीत घेण्यात आला. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पिंपरी-चिंचवडचे पोलीस सहपोलीस आयुक्त डाॅ. शशिकांत महावरकर, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित होते.
विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यानिमित्त अनुयायांची होणारी गर्दी विचारात घेऊन मंगळवारी (३१ डिसेंबर) दुपारपासून नगर रस्ता, सोलापूर रस्ता परिसरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत.