“लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ मुख्य कार्यालयाचे उदघाटन आज झाले आहे. याबद्दल मला खूप आनंद होत आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी संपूर्ण आयुष्य या ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी काम केले आहे. त्यांना देखील वाटत होते की, एखादे महामंडळ असावे, पण त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये झाले नाही. त्यांच्या वारसदारांना संधी मिळाली. त्यांच्याकडून देखील झाले नाही,” अशा शब्दात सामाजिक न्याय राज्यमंत्री धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचे नाव न घेता,त्यांना टोला लगावला. लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊस तोड कामगार कल्याण महामंडळाच्या मुख्य कार्यालयाचे पुण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन उदघाटन झाले. यावेळी धनंजय मुंडे बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह आजी माजी आमदारही या कार्यक्रमाला उपस्थित होते.
धनंजय मुंडे म्हणाले, “जीवनामध्ये काही क्षण येऊन जातात, ते क्षण गेलेले देखील कळत नाही. माझ्या जीवनातील आजचा दिवस हा क्षण सुवर्ण अक्षराने लिहावा असा आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊस तोड कामगार मंडळाची स्थापना नाही, तर या मंडळाच्या मुख्य कार्यालयाचे उदघाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले आहे. महाविकास आघाडीचं सरकार आलं, सरकारमध्ये मंत्री म्हणून काम करण्याची संधी शरद पवार, अजित पवार यांनी दिली.”
“माझा जन्म ऊस कामगाराच्या पोटी झाला”
“या विभागाची जबाबदारी घेत असताना अजित पवार यांना एक विनंती केली होती की, ऊस तोड कामगार मंडळ म्हटलं की, ते कामगार विभागाकडे जाईल. त्यामुळे मला ऊस कामगारांसाठी खूप काही करायचे आहे. माझा जन्म ऊस कामगाराच्या पोटी झाला आहे. माझ्या वडिलांनी ऊस देखील तोडला आहे. बांध देखील भरलेले आहेत आणि सर्व कामं केली आहेत. तसेच आजचा माझ्या जीवनातील दिवस अजित पवार यांच्या शिवाय हे शक्यच नव्हते. हे मी प्रामाणिकपणे सर्वांसमोर सांगतो. हे माझं कर्तव्य समजतो,” असं धनंजय मुंडे यांनी सांगितलं.
“पहिल्या अर्थसंकल्पात ऊस तोड मजुरांच्या मंडळाची घोषणा”
धनंजय मुंडे म्हणाले, “गेली अनेक वर्ष कराड सरांनी सांगितले की, या समित्या झाल्या, त्या समित्या झाल्या. मागच्या पाच वर्षात पहिल्या वर्षात मंडळ आलं, दुसर्या वर्षात रद्द झालं. तिसर्या वर्षात तिसरं आलं, चौथ्या वर्षात रद्द झालं आणि पाचव्या वर्षात देखील रद्द झाले. नेता आपला असावा, तर असा असावा. अभिमान वाटतो सांगायला, पहिल्या अर्थसंकल्पात ऊस तोड मजुरांच्या मंडळाची घोषणा तर केलीच, पण भविष्यात मंडळाला कोणत्याही प्रकारची आर्थिक अडचणी येऊ नये यासाठी तरतूदही केली.”
हेही वाचा : “महाविकास आघाडीला महिलांविषयी कळवळा असेल, तर करुणा मुंडे यांना…”, चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल
“भविष्यात कधीही या मंडळाला पैशाची कमी पडणार नाही”
“राज्यात गाळप होणार्या प्रत्येक टनामागे १० रुपये ऊस तोड कामगाराच्या कल्याणासाठी ऊस कारखानदाराने ठेवावे आणि राज्य सरकार मार्फत देखील १० रुपये ठेवण्याचा निर्णय घेतला गेला आहे. ते फक्त अजित पवार यांनी केले आहे. यामुळे भविष्यात कधीही या मंडळाला पैशाची कमी पडणार नाही. या मंडळामार्फत राज्यातील ऊस तोड कामगारांच्या कुटुंबीयांची विशेष काळजी घेतली जाणार आहे. त्यांच्या मुलांचं पदवीपर्यंत शिक्षण कसं होईल हे पाहिलं जाणार आहे,” असंही धनंजय मुंडे यांनी नमूद केलं.