सर्व धर्म गुण्यागोविंदाने राहण्याची परंपरा असलेल्या आपल्या देशात काही तरी वादंग व्हावे, अशीच धारणा सत्तांतर झाल्यानंतर जे सत्तेत आले त्यांच्या मनात आहे. सत्तेत येण्यापूर्वी सर्वसामान्यांना दिलेले ‘अच्छे दिन’चे आश्वासन ते पूर्ण करू शकले नाहीत म्हणून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी या देशात सातत्याने वादंग निर्माण झाले पाहिजे, अशी पद्धतशीर योजना या मंडळींकडून राबवली जात आहे, असा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सांगवीत केला. केंद्रात व राज्यातील सत्तेचे नियंत्रण असलेल्या ‘नागपूर’मधून लोकांना घाबरवण्याचे, त्यांच्या पायात साप सोडण्याचे काम केले जाते, असा संदर्भही त्यांनी दिला.
सांगवी येथील सिझन ग्रूपच्या वतीने आयोजित प्रबुद्ध उद्योजक पुरस्कारांचे वितरण मुंडे यांच्या हस्ते झाले, तेव्हाच्या सभेत ते बोलत होते. उपमहापौर प्रभाकर वाघेरे, स्थायी समिती अध्यक्ष डब्बू आसवानी, संयोजक प्रशांत शितोळे आदी उपस्थित होते.
मुंडे म्हणाले, या चलाख लोकांनी शाकाहार आणि मांसाहार हा नवीनच वाद निर्माण करून बाबासाहेबांच्या घटनेवर पहिला वार केला. कुणी काय खावे आणि काय खाऊ नये, असे सांगत ते आपल्या स्वयंपाकघरापर्यंत आले. मात्र, हे प्रकरण अंगाशी येईल, असे वाटले. तेव्हा हैद्राबादच्या रोहित वेमुलाचे प्रकरण घडले. ते अंगावर येऊ लागले म्हणून दिल्लीतील जेएनयूचे भूत उकरून काढण्यात आले. तेथून ‘भारत माता की जय’ सुरू झाले. देशातील सर्व समस्या संपल्या आहेत का, राष्ट्रनिष्ठेचे प्रमाणपत्र ही मंडळी वाटणार आहेत का, भारत माता की जय म्हणणार नाही, असे म्हणणाऱ्या ओवेसींना मोकळे सोडले. मात्र, पुण्यात दलित चळवळीच्या विद्यार्थ्यांवर राष्ट्रद्रोहाचे गुन्हे दाखल करायला लावले. बाबासाहेबांचे विचार संकटात आहेत. घटनेने उपेक्षितांसाठी आरक्षणाचा अधिकार दिला. त्याचा पुनर्विचार करण्याचे आदेश नागपूरमधून सुटतात. गावाकडच्या भाषेत याला पायात साप सोडणे म्हणतात. नागपूरची ही जुनी पद्धत आहे. एखादी घोषणा करायची, एखाद्या विषयाला तोंड फोडायचे म्हणजे संपूर्ण देशभर त्याची चर्चा सुरू होते. बाबासाहेबांच्या चळवळीला ज्यांनी सातत्याने विरोध केला त्यांना आज त्यांचे नाव वापरण्याची घाई झाली आहे. कारण बाबासाहेबांच्या विचारांशिवाय सत्ता टिकवू शकत नाही, याची त्यांना खात्री झाली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा