‘आदिवासी जमातींच्या यादीत असलेला ‘धनगड’ हा उल्लेख म्हणजे टंकलेखनातील चूक असून त्या ठिकाणी ‘धनगड’ ऐवजी ‘धनगर’ असे वाचले गेले पाहिजे, हा धनगर समाजाने केलेला दावा दिशाभूल करणारा आहे. ‘धनगड’ व ‘धनगर’ या परस्परांशी काहीही संबंध नसलेल्या स्वतंत्र जमाती आहेत,’ असे स्पष्टीकरण देत दलित व आदिवासींसाठी काम करणाऱ्या संघटनांनी धनगर आरक्षणाच्या मागणीचा निषेध नोंदवला.
‘दलित आदिवासी अधिकार आंदोलन’ या संघटनेचे डॉ. नितीश नवसागरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. संघटनेचे प्रियदर्शी तेलंग, ‘जनवादी महिला मंचा’च्या किरण मोघे, अभिजित गडकर, मिलिंद सहस्रबुद्धे या वेळी उपस्थित होते. धनगरांचा आदिवासींमध्ये समावेश करण्याचा निर्णय झाल्यास तो आदिवासींच्या संधी हिरावून घेणारा ठरेल, असा मुद्दा या संघटनांनी मांडला आहे.
‘आदिवासी जमातींच्या यादीतील क्रमांक ३६ मध्ये ‘ओरान, धनगड’ असा एकत्र उल्लेख असून ‘ओरान’ या जमातीची ‘धनगड’ जमात ही उपशाखा आहे. महाराष्ट्रात ‘ओरान’ जमातीला ‘धनगड’ किंवा ‘कुरूख’ असे म्हटले जाते. शेती व शेतमजुरी हा या जमातीचा प्रमुख व्यवसाय असून ओरिया भाषेशी त्यांचा संबंध आहे. छोटा नागपूर, मध्य प्रदेश, ओरिसा, पश्चिम बंगाल या सलग आदिवासी पट्टय़ात ही जमात स्थिरावली आहे. चंद्रपूरमधील बल्लारशाह पेपर मिलमध्ये या जमातीचे नागरिक जंगल कामगार म्हणून कामही करतात,’ अशी माहिती संघटनेतर्फे देण्यात आली.
‘एखादी जमात ‘आदिवासी जमात’ ठरण्यासाठी त्यांची भौगोलिक अलिप्तता हा प्रमुख निकष मानला जात असून ‘ओरान, धनगड’ जमात हा निकष पूर्ण करते. उलट धनगर जमात राज्याच्या अनेक जिल्ह्य़ांत मोठय़ा संख्येने आढळत असून ते आदिवासी ठरत नाहीत,’ असेही या वेळी सांगण्यात आले.