पुणे : पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत असलेल्या २१ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (पिफ) स्पर्धात्मक विभागामध्ये “धर्मवीर, मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे ‘धर्मवीर’सह सात मराठी चित्रपटांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी विजेतेपदासाठी स्पर्धा होणार आहे.
महोत्सवातील स्पर्धात्मक विभागातील सात मराठी चित्रपटांची घोषणा महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी सोमवारी केली. त्यामध्ये ‘मदार’ (दिग्दर्शक – मंगेश बदार), ‘ग्लोबल आडगांव’ (दिग्दर्शक – अनिल कुमार साळवे), ‘गिरकी’ (दिग्दर्शक – कविता दातीर आणि अमित सोनावणे), ‘टेरेटरी’ (दिग्दर्शक – सचिन मुल्लेम्वार), ‘डायरी ऑफ विनायक पंडित’ (दिग्दर्शक – मयूर करंबळीकर) ‘धर्मवीर; मुक्कम पोस्ट ठाणे’ (दिग्दर्शक – प्रवीण तरडे) आणि पंचक (दिग्दर्शक – जयंत जठार आणि राहुल आवटे) या सात चित्रपटांमध्ये स्पर्धा होणार आहे. सध्याचे राजकारण ‘धर्मवीर’ या एकाच शब्दाभोवती फिरत असताना ‘धर्मवीर’ चित्रपटाची स्पर्धात्मक विभागामध्ये निवड होण्याचा योग साधला गेला आहे.