गेल्या अनेक महिन्यांपासून उद्घाटनाची प्रतीक्षा असलेल्या धायरी फाटा येथील उड्डाणपुलाच्या उद्घाटनासाठी अखेर महापालिकेला वेळ मिळाला असून या पुलाचे उद्घाटन मंगळवारी (१० जून) महापौर चंचला कोद्रे यांच्या हस्ते केले जाणार आहे.
सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी या पुलाचे नियोजन करण्यात आले होते. गेली तीन वर्षे पुलाचे काम सुरू होते. मध्यंतरी हे काम विविध कारणांनी रखडले होते. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये उर्वरित कामे वेगाने पूर्ण करण्यात आली आणि अखेर या पुलाचे काम पूर्ण झाले. मात्र पुलाचे काम पूर्ण होऊनही तो नागरिकांना वापरण्यासाठी उपलब्ध नव्हता. पुलाच्या उद्घाटनाची सर्वानाच प्रतीक्षा होती. पूल बांधून पूर्ण झाल्यानंतरही त्याचा वापर करू दिला जात नसल्यामुळे नागरिक स्वत:हूनच पुलाचा वापर सुरू करतील, असाही इशारा देण्यात आला होता.
टिळक रस्ता प्रभाग समितीच्या अध्यक्षा, नगरसेविका युगंधरा चाकणकर आणि स्थानिक नगरसेवक राजाभाऊ लायगुडे यांनी शनिवारी महापौर चंचला कोद्रे यांची भेट घेऊन हा पूल वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी केली. त्यांच्या मागणीनंतर अखेर पुलाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे नियोजन महापालिकेत करण्यात आले. त्यानुसार आता मंगळवारी पुलाचे उद्घाटन महापौरांच्या हस्ते केले जाणार आहे. महापालिकेतील सर्व पदाधिकारी आणि पक्षनेतेही यांचीही या कार्यक्रमात उपस्थित असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा