पुण्यातला गणेशोत्सव म्हटले, की डोळ्यासमोर उभा राहतो, तो तरुणांचा उत्साह.. रात्रंदिवस चालणारी मिरवणूक.. अन् आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेली ढोल-ताशा पथके! पथकांचा उत्साह, त्यासाठी तरुणाईचे एकत्र येणे या सगळ्या चांगल्या गोष्टींच्या आड आता आर्थिक राजकारण आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या गुंडागिरीचा शिरकाव झाला आहे. पुण्यातील सगळ्या ढोल-ताशा पथकांची फक्त गणपतीच्या दिवसांमधील उलाढाल काही कोटी रुपयांच्या घरात पोहोचल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
पुण्यातील ढोल-ताशा पथकांची संख्या या वर्षी साधारण दोनशेच्या घरात गेली आहे. या वर्षी ३० ते ३५ पथके वाढली असल्याचे ढोल-ताशा महासंघाचे सचिव अनूप साठे यांनी सांगितले. पुण्यातील नदीकाठचे रस्ते हे या पथकांचे हक्काचे ठिकाण! काही वर्षांपूर्वी मोजकीच पथके होती. मात्र, मिरवणुकीमधील आर्थिक उलाढालीमुळे पथकांची संख्या गेल्या दोनतीन वर्षांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढत गेली. छोटय़ा पथकांचे मानधन हे अगदी दहा हजार रुपयांपासून सुरू होते ते अगदी एका मिरवणुकीसाठी २ लाख रुपये मानधन घेणारीही पथके आहेत. सरासरी मानधन हे साधारण २० हजार रुपये आहे. एक पथक गणपतीच्या कालावधीत किमान चार मिरवणुका करते. अशी दोनशेहून अधिक लहान-मोठी पथके पुण्यात आहेत. या हिशोबाने या पथकांची उलाढाल काही कोटी रुपयांच्या घरात पोहोचल्याचे दिसत आहे. गणपती मंडळे किंवा शहरातील गणेशोत्सवावर राजकीय पगडा पूर्वीपासूनच आहे. साहजिकच आता पथकांमध्येही राजकीय हस्तक्षेप सुरू झाले आहेत.
काही पथके मिळालेले मानधन हे सामाजिक कार्यासाठी वापरतात, तरुणांसाठी नवे उपक्रम सुरू करतात. मात्र, असे काम करणाऱ्या पथकांची संख्या ही बोटावर मोजण्याइतकीच आहे. बाकीच्या पथकांच्या आर्थिक उलाढालीवर सध्या कुणाचेच नियंत्रण राहिलेले नाही. बहुतेक पथके मानधनही रोख घेतात आणि गणेश मंडळेही त्यालाच प्राधान्य देतात. त्यामुळे सगळाच बेहिशोबी कारभार वाढू लागला आहे.
पथकांतील संस्कृती हरवली?
अप्पा पेंडसे यांनी १९७० साली पहिल्यांदा ज्ञान प्रबोधिनी ढोल ताशा पथकाची सुरुवात केली. त्यानंतर अनिल गाडगीळ यांनी विमलाबाई गरवारे महाविद्यालय पथकाची सुरुवात केली. नंतर नू.म.वि. प्रशाला आणि रमणबाग या ढोल ताशा पथकांची सुरुवात झाली. पूर्वी शाळांमध्ये एक खेळ किंवा उपक्रम असेच या पथकांचे स्वरूप होते. कालांतराने डीजेला उत्तर म्हणून ढोल-ताशा पथकांना एका चळवळीचेच रूप आले आणि पथके शाळेच्या बाहेरही सुरू झाली. लहान मुली-मुले, महिला, एक सारखा आवाज, तरुणाईचा उत्साह, शिस्त आणि अपार मेहनत अशा अनेक कारणांमुळे पुण्याच्या ढोल-ताशाचे वेगळेपण सगळीकडे ठसले. मात्र, गेल्या तीन ते चार वर्षांत या पथकांची आर्थिक उलाढाल वाढत गेली आणि त्यामुळे पथकांची संख्याही मोठय़ा प्रमाणावर वाढली. संस्कृती जोपासण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या या चळवळीचा प्रवास आता पुन्हा धिंगाण्याकडेच सुरू झाला आहे.
‘‘ढोल-ताशा पथकांचे राजकीयकरण झाले आहे. या पथकांच्या व्यवहारावर नियंत्रण येण्यासाठी आता नियमावलीची आणि त्याची अंमलबजावणी होण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. नैतिकतेतून चांगली भूमिका घेऊन पथके सुरू झाली. मात्र, आता ती परिस्थिती राहिली नाही. काम थोडे आणि चर्चा फार असे पथकांचे झाले आहे. समाजाचा पाठिंबा असेल तर त्याला सामाजिक कार्य म्हणता येते मात्र, आता नागरिकच याला कंटाळले आहेत,’’ असे मत मंदार देशपांडे यांनी व्यक्त केले.
पथकांमुळे समस्या
पथकांमुळेही नागरिकांना काही समस्यांनाही सामोरे जावे लागत आहे. सरावादरम्यान होणाऱ्या आवाजाच्या त्रासाच्या पोलिसांकडे सातत्याने तक्रारी येत आहेत. म्हात्रे पूल ते राजाराम पूल या दरम्यानचा नवा डीपी रस्ता, नदी पात्रातला रस्ता या ठिकाणी शेकडोंच्या संख्येने तरुणाई सरावासाठी जमते. सराव बघण्यासाठी बघ्यांचीही गर्दी असते. त्यामुळे वाहतुकीची समस्याही निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी पथकांमध्ये आपापसात भांडणे, मारामाऱ्या यांसारख्या घटनाही घडल्या होत्या. त्या अनुषंगाने पथकांमधील मुली, लहान मुले यांच्या सुरक्षेचा प्रश्नही आहे.
वाढती स्पर्धा…
पथकांच्या वाढत्या संख्येमुळे त्यांच्यातील स्पर्धाही आता शिगेला पोहोचली आहे. सरावासाठी, वाद्य ठेवण्यासाठी जागा, सुपारी मिळवण्यासाठी, मुलांना आकर्षून घेण्यासाठी पथकांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. वाढत्या स्पर्धेचा परिणाम पथकांच्या उत्पन्नावरही काही प्रमाणात झाला असल्याचे पथकातील वादक सांगतात. त्यामुळे पथकांनाही टिकून राहण्यासाठी धडपड करावी लागत आहे. पूर्वी गणपती उत्सवासाठी सुरू झालेली पथके आता राजकीय मिरवणुका, मेळावे या ठिकाणीही वादन करताना दिसू लागली आहेत. पथकांचे मानधन कमी झाले आहे. मात्र, त्याच वेळी वाद्य, वाहतूक याचा खर्च वाढला आहे. त्यामुळे पथकांनाही त्याचा खर्च भागवणे कठीण होत असल्याचे मत संजय सातपुते यांनी व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा