पुणे : मधुमेही रुग्णांना झालेल्या जखमा या दीर्घकाळ बऱ्या होत नाहीत. त्यावर फारसे खात्रीशीर उपचारही उपलब्ध नाहीत. भारताबरोबरच जागतिक पातळीवर ही एक मोठी वैद्यकीय समस्या आहे. आता मधुमेहींना या समस्येपासून दिलासा मिळणार आहे. पुणेस्थित कंपनीच्या नवीन औषधाला ‘डायबेटिक फूट अल्सर’च्या उपचारासाठी मंजुरी मिळाली आहे. पुणेस्थित नोव्हालीड फार्मा कंपनीचे एकस्व अधिकारप्राप्त हे नवीन औषध आहे. हे औषध हृदयविकारांसाठी वापरात असलेल्या एस्मोलोल हायड्रोक्लोराइड या औषधाचे संपूर्णपणे वेगळे आणि नवीन रूप आहे.
‘डायबेटिक फूट अल्सर’च्या उपचारांसाठी या औषधाच्या देशांतर्गत बाजारपेठेत वितरणासाठी केंद्रीय औषधे मानके नियंत्रण संस्थेकडून (सीडीएससीओ) मंजुरी मिळाली आहे. हे औषध मधुमेही रुग्णांच्या पायाला आणि पावलांना होणाऱ्या जखमांवर उपयोगी ठरून त्या पूर्णपणे भरून काढण्यास मदत करते. रुग्णांच्या सुरक्षिततेला अग्रस्थानी ठेवून सर्वसमावेशक वैद्यकीय चाचण्या घेऊन हे औषध विकसित करण्यात आले आहे.
हेही वाचा – दुर्दम्य इच्छाशक्ती! जीवघेण्या आजारावर मात करून तिची पावले पुन्हा थिरकली
याबद्दल नोव्हालीड फार्माचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुप्रीत देशपांडे म्हणाले की, मधुमेही रुग्णांपैकी १५ ते २५ टक्के जणांना आयुष्यात एकदा तरी ‘डायबेटिक फूट अल्सर’चा त्रास होतो. दीर्घकालीन मधुमेहामुळे निर्माण होणारी ही गुंतागुंत आहे. अशा जखमा बऱ्या न झाल्यामुळे पायाचा काही भाग गमवावा लागण्याचे प्रमाण खूप आहे. भारतात दरवर्षी अशी सुमारे लाखभर प्रकरणे समोर येतात. या पार्श्वभूमीवर या जखमा पूर्णपणे बऱ्या करणाऱ्या या औषधाला मिळालेली मान्यता हा उपचारातील एक महत्त्वाचा टप्पा आहे.
नोव्हालीडचे औषध हे हृदयविकारांसाठी वापरात असलेल्या एस्मोलॉल हायड्रोक्लोराइड या औषधाचे नवीन रूप आहे. हे औषध हृदयविकारांसाठी लस स्वरूपात दिले जाते. नोव्हालीडने जखमांवर वापरता येईल अशा मलम (टॉपिकल जेल) स्वरूपात ते तयार केले आहे. या शोधासाठीचे एकस्व अधिकार कंपनीला भारतासह अमेरिका, युरोप, जपान, चीन आदी अनेक देशांत मिळालेले आहेत. हे औषध सर्वप्रथम भारतात वितरित केले जाईल.
‘डायबेटिक फूट अल्सर’चा वाढता धोका
जगभरात ५३ कोटींहून अधिक लोक मधुमेहग्रस्त आहेत. ही संख्या २०३० पर्यंत ६४ कोटींवर जाण्याचा अंदाज आहे. सुमारे १५ ते २५ टक्के मधुमेहींना आयुष्यात एकदा तरी ‘डायबेटिक फूट अल्सर’चा त्रास होतो. यापैकी सुमारे २५ टक्के रुग्णांना अखेरीस पायाचा काही भाग गमावावा लागतो. त्यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होतो. हा एक गंभीर आजार असून, त्यावरील औषधांचे पर्यायही खूप मर्यादित आहेत. याचबरोबर उपचारांचा खर्चही जास्त आहे.