आकाशवाणी पुणे केंद्राच्या हीरकमहोत्सवी वर्षांनिमित्त शनिवारपासून (१६ मार्च) साहित्य आणि संगीत कार्यक्रमांचा सप्ताह रसिकांना अनुभवता येणार आहे. हे कार्यक्रम विनामूल्य असून त्यासाठी आकाशवाणी केंद्रामध्येच प्रवेशिका उपलब्ध होणार आहेत.

कार्यक्रमाच्या उद्घाटनाला पुष्पराज कोष्टी यांचे सूरबहारवादन, पं. रमाकांत-उमाकांत गुंदेचा बंधूंचे गायन होणार आहे. याशिवाय सप्ताहात रूद्रवीणावादक बहाउद्दीन डागर, पं. निर्माल्य डे, पखवाजवादक पं. रामाशिष पाठक, पं. अभय नारायण मलिक यांचे कार्यक्रम होणार आहेत. कलमाडी हायस्कूलच्या शेट्टी सभागृहामध्ये या मैफली होणार आहेत, अशी माहिती आकाशवाणीचे केंद्र प्रमुख आशिष भटनागर आणि कार्यक्रम अधिकारी रवींद्र खासनीस यांनी दिली. याशिवाय कवी दत्ता हलसगीकर यांच्या कवितांवर आधारित कार्यक्रम होणार, कवयित्री इंदिरा संत यांच्या जन्मशताब्दीनिमित्त असे विविध कार्यक्रम या सप्ताहात होणार आहेत.

पुणे केंद्र लवकरच ‘एफएम’वर

आकाशवाणी पुणे केंद्र सध्या ‘मीडियम वेव्ह ट्रान्समिशन’वर आहे. तर, विविध भारती केंद्र ‘एफएम’वर असल्यामुळे मोबाईलधारकांना ते ऐकता येते. त्या पाश्र्वभूमीवर पुणे केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम मोबाईलधारकांना ऐकता यावेत यासाठी हे केंद्रदेखील ‘एफएम’वर नेण्याची आवश्यकता असल्याचे मत प्रसारभारतीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. हा निर्णय देशपातळीवर होण्याची अपेक्षा असल्याने केवळ आकाशवाणी पुणे केंद्र हे त्याला अपवाद करता येणार नसल्याची माहिती केंद्र प्रमुख आशिष भटनागर यांनी दिली.