पुणे : भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांची आघाडी वाढत असल्याने भाजपा पदाधिकाऱ्यांनी पराभव स्वीकारल्याचे दिसून येत आहे. मतमोजणी केंद्रातून प्रमुख पदाधिकाऱ्यांनी काढता पाय घेतला असून, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये जल्लोष सुरू झाला आहे. भाजपा पदाधिकारी वृत्तवाहिन्यांना देत असलेल्या प्रतिक्रियांवरून पराभव स्वीकारल्याचे स्पष्ट होत आहे.
कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक भाजपाने प्रतिष्ठेची केली होती. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी पहिल्यापासूनच भाजपा उमेदवार हेमंत रासने यांना कडवी लढत दिली होती. धंगेकर यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली असून आघाडी फेरीनिहाय वाढत आहे. त्यातच भाजपाला त्यांच्या हक्काच्या प्रभागातही अपेक्षित मतदान न झाल्याने रासने यांचे मताधिक्य कमी झाल्याची चर्चा आहे. रवींद्र धंगेकर यांची आघाडी वाढत असल्याचे दिसू लागल्यानंतर महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मतमोजणी परिसरात गर्दी सुरू केली आणि भाजपा पदाधिकाऱ्यांनी मतमोजणी परिसरातून काढता पाय घेतला. काही मोजके पदाधिकारीच मतमोजणी केंद्रात उपस्थित असून, अजून निकाल फिरू शकतो, असा दावा पदाधिकारी करत आहेत.