शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेवच्या जयघोषात रायगडचा कानाकोपरा दुमदुमुन गेला.. निमित्त होते शिवाजी महाराजांच्या ३३३ व्या पुण्यतिथीचे.
श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या वतीने यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. विधानपरिषेदतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे, आमदार भरत गोगावले, विनायक मेटे, रायगड किल्ला परिषदेच्या अध्यक्षा वर्षां गायकवाड, भोसले घराण्याचे वंशज श्रीमंत शिवाजीराव भोसले, इतिहासाचे अभ्यासक पांडुरंग बालकवडे या प्रसंगी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात जगदीश्वर मंदिरातील पूजनाने आणि हनुमान जयंती उत्सवाने झाली. राजदरबारात झालेल्या कार्यक्रमात ‘शिवराज मुद्रा’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच शिवकथाकार विजयराव देशमुख यांना ‘श्री शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार’ ने सन्मानित करण्यात आले. मुख्य कार्यक्रमानंतर राजदरबारापासून बाजारपेठेपर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत तुताऱ्या, सनई-चौघडा, संबळ वादन, भगवे ध्वज, पताका आणि अबदागिरी घेतलेले युवक मोठय़ा प्रमाणात सहभागी झाले होते.

Story img Loader