प्रतिनिधी : २७ मार्च हा दिवस ‘जागतिक रंगभूमी दिन’ म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. १९६१मध्ये ‘युनेस्को’च्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिटय़मूटने या दिवसाची सुरुवात केली. पहिला जागतिक रंगभूमी दिन १९६२ मध्ये साजरा झाला. जागतिक नाटय़ परिषदेच्या २३९ केंद्रांच्या माध्यमातून या दिवसाचे महत्त्व समजावे म्हणून विविध उपक्रम केले जातात. हा कार्यक्रम दोन दिवस चालतो. यामध्ये वेगवेगळ्या देशांचे प्रतिनिधी येऊन तेथे वैविध्यपूर्ण प्रयोगांचे सादरीकरण करतात. या वर्षीचा जागतिक उत्सव रोम आणि पिसारो, इटली येथे होत असून त्यात रंगभूमीकलेबाबतची उद्घोषणा करण्याचा मान कार्लस सेलड्रॉन (क्युबा) यांना मिळालाय.
या दिवशी आंतरराष्ट्रीय संदेशाचे वाचन केले जाते. यंदाच्या संदेशात युवा रंगकर्मीनी बालनाटय़ लेखनाला प्राधान्य द्यायला हवे असे नमूद केले असून जगातील राजकारणी, सरकार, प्रेक्षक आणि नाटय़ संस्थांसाठी हा दिवस म्हणजे ‘वेक अप कॉल’ आहे. नाटय़कलेचे महत्त्व आणि किंमत समजून घेऊन तिला सर्व पातळ्यांवर आधार दिला जावा, यासंबंधी जागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो आहे. याला अनुषंगून सु-दर्शन रंगमंच येथे आज एक आगळा-वेगळा नाटय़प्रयोग पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्याविषयी..
शाळेच्या दप्तरातील प्रत्येक वस्तूवरच विद्यार्थ्यांचे अतोनात प्रेम असते. वह्य़ा-पुस्तके ही शाळेसाठी आवश्यकच आहेत, हे जरी खरे असले तरी यांच्याशिवाय कंपास बॉक्समधल्या विविध वस्तू, त्यातही खोडरबरसारखी गोष्ट जरी हरवली तरी बालमन अस्वस्थ व्हायला होते. आपली वस्तू कोणी मागितली तर ती देण्याआधी दहा वेळा विचार केला जातो आणि आपण एखाद्याला एखादी वस्तू दिली आणि ती त्याच्या हातून हरवली, तुटली तर मग काय विचारायलाच नको. पेन, पेन्सिल, दफ्तर, पाटी, टिफिन, गणवेश, आयकार्डपासून वही, पुस्तक, कंपासपेटी अशा कितीतरी वस्तू या मुलांच्या हक्काच्या असतात. त्याला कोणी हात लावला तर ही बालमंडळी आकांडतांडव करतात. अशा वस्तूंना नाटय़रूपात आणणाऱ्या पहिल्यावहिल्या नाटकाचा प्रयोग आजच्या जागतिक रंगभूमी दिनानिमित्त आयोजित करण्यात आला आहे.
कविता मनाला संवेदित करते, ज्यात मुलांच्या भावविश्वाला स्पर्शित करण्याची शक्ती आहे. म्हणून मुलांच्या दररोजच्या वापरातील वस्तूंवरील देवदत्त पाठक यांच्या लेखन, दिग्दर्शनातून निर्मिती झालेले त्रेचाळीस कवितांचे नाटक म्हणजे ‘पैली ते चवथी-आनंदाचा ठेवा’. या नाटकाचा प्रयोग आज सायंकाळी ‘सुदर्शन रंगमंच’ येथे सायंकाळी पावणेसात वाजता होतो आहे. या नाटकात केवळ मुलेच नाहीत तर त्यांचे पालकही सहभागी होत आहेत, हे या नाटकाचे विशेष. या नाटकासाठी मिलिंद केळकर यांनी सहायक दिग्दर्शकाची भूमिका तर सूत्रधारची जबाबदारी दीपिका पाठक यांनी पार पाडली असून गुरुस्कूलच्या सोळा विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा या नाटकात प्रत्यक्ष सहभाग आहे.
मराठी बालरंगभूमीवरील नवा, वेगळा कवितांच्या नाटकांचा प्रयोग अगदी प्रथमच होतोय असं म्हणले तर वावगे ठरणार नाही. या नाटकामुळे प्रत्येकाच्याच बालपणाच्या रम्य आठवणी जाग्या होतात, हे देखील या नाटकाचे विशेष. प्रत्येक कविता वस्तूंप्रमाणे वेगळी, तिचे रूपडेही वेगळे. एकही वस्तू न वापरता त्या वस्तूंचा वापर मुलांनी केलाय अशी साक्षात भावना नाटक बघताना होतो. कुठलाही संदेश जाणीवपूर्वक न देता, तो कृती, हालचाली, आविर्भावातून मुले कवितेबरोबर देत राहतात. काहीतरी अद्भुत अनुभवले आणि बालपणातले परत काहीतरी सापडले, जे या नाटकातून विलक्षण सुखावणारे ठरते.
आलोक, अक्षता जोगदनकर या मुलांसह त्यांची आई सीमा, वनश्री-निसा या मुलांसह नेहा गुप्ते, मल्हारसह गौरी बनसुडे, सलमानसह शहाजहान शेख, स्पर्शसह सोनाक्षी महाडिक, विक्रांत आणि तनुश्री या मुलांसह पूर्वा केसकर, श्रुतीसह मंजू कदम अशा मुले-पालकांसह शुभेंद्र गायकवाड, आकाश भुतकर या नाटकात सहभागी होणार असून त्यांच्या अभिनयांतून वस्तूंवरील कविता उलगडत जातील.