सुधीर जन्नू, लोकसत्ता

बारामती : यवत (ता. दौंड) येथील संतशिरोमणी तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी पिठलं-भाकरीची वेगळी परंपरा जतन करीत वारकऱ्यांना खास पिठलं-भाकरीचा आस्वाद देण्यात आला.

यवत येथे गेल्या सहा दशकांपासून वारीतील वारकऱ्यांना विठोबा भोजनामध्ये पिठलं भाकरी तयार करून दिली जाते. घराघरातून पिठलं आणि भाकरी तयार करून वारकरी बांधवांना प्रसादाच्या रूपाने दिला जातो. यवत येथील ग्रामदैवत काळभैरव मंदिरामध्ये विसावाच्या वेळी पिठलं-भाकरी महाप्रसाद म्हणून दिला जातो. या मंदिराचे विश्वस्त आणि गावकरी यांच्यासाठीही पिठलं भाकरीचा आस्वाद हेच भोजन असते. विठ्ठल-रुक्मिणीचा महाप्रसाद म्हणून पिठलं भाकरीला एक अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.

आणखी वाचा-खंडेरायाच्या जेजुरी नगरीत भंडारा उधळून माउलींचे स्वागत

संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा यवत, वरवंड करत पुढे मार्गस्थ झाला. बारामती तालुक्यातील गवळ्याची उंडवडी येथे शुक्रवारी (५ जुलै) पालखी सोहळ्याचा मुक्काम राहणार आहे.