आपल्या घराचा एक भाग म्हणजे आपली बाग. बागेतील वेगवेगळ्या घटकांची रचना बागेची शोभा वाढवते. कुंडय़ांमधील विविधता व त्यांची मांडणी यामुळे बागेची शोभा तर वाढतेच; शिवाय त्यातील बदल आपल्यालाही सतत नावीन्याचा आनंद देते. कुंडय़ांची रचना वेगवेगळ्या पद्धतीत करता येते. काही कुंडय़ा जमिनीवर, काही पायऱ्यांवर, एखादी कुंडी शोभिवंत दगडावर, जुन्या जात्यावर अथवा वाळक्या ओंडक्यावर ठेवता येते. तर, कधीकधी या कुंडय़ा हवेतही टांगता येतात. फॅब्रिकेटेड कुंडय़ांना अडकवलेली ही शिंकाळी म्हणजे हिरवी झुंबरे. छोटी बाल्कनी व सोसायटी पाìकग किंवा बंगल्यांच्या झाडांवरती ही झुंबरे शोभून दिसतात व जागाही वाचवतात. झाडांच्यासुद्धा आवडीनिवडी असतात. तसेच प्रत्येकाची वाढण्याची सवयही वेगळी असते. काहींना सरळ वर जायला आवडते, तर काहींना जमिनीवर धावायला आवडते, तर काहींना वरून खाली झेपावयाला आवडते. त्यांच्या आवडीनुसार व आपल्या जागेच्या उपलब्धतेनुसार झाडांची निवड करावी लागते. छोटय़ा बाल्कनीत रांगेने झाडे ठेवली तर मर्यादित झाडे बसतात ,त्यामुळे बाल्कनीच्या स्लॅबला हुक लावून त्यात कुंडय़ा अडकवता येतात. त्यासाठी तारेच्या बास्केट किंवा प्लॅस्टिकच्या कुंडय़ा मिळतात. या कुंडय़ा किंवा टोपल्यांचा आकार सहा सहा सहा पेक्षा जास्त मोठा नसावा. या टोपल्याच्या आत पूर्वी मॉस भरत असत. पण आता मॉस काढण्यावर बंदी आहे, कारण त्याने ऑíकडसारख्या वनस्पतींचे अधिवास नष्ट होतात. त्यामुळे या कुंडय़ा भरण्यासाठी तळास नारळाच्या िपजलेल्या शेंडय़ा (कॉयर), नारळाच्या झाडाच्या बुंध्याचे वल्कल किंवा जुने ज्युटचे पोते वापरावे. त्यामध्ये तीन भाग कोकोपीथ व एक भाग सेंद्रिय माती वापरून कुंडी भरून घ्यावी. कोकोपीथ घातल्याने ओल धरून ठेवण्यास मदत होईल व प्लॅस्टिकच्या कुंडीत हवा चांगली खेळती राहील. या टोपल्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावता येतात. स्पायडर प्लँट हे पांढऱ्या, हिरव्या रिबिनींचे चिमुकले रोप खूप लोकप्रिय आहे. कारण हे घरात कमी उन्हात तसेच बाहेरही छान वाढते. ही रोपे टोपलीत लावून ती आकडय़ास लटकवावी. झाडांच्या मुळांपासून नवीन रोपं वाढतात व टोपली गच्च भरते. मुळांपासून नाजूक काडय़ा फुटतात व या काडय़ांना रोपांचे फुटवे येतात. ही छोटी छोटी लोलकासारखी लटकलेली रोपं टोपलीची शोभा वाढवतात. यामध्ये नाजूक पानांची, हिरव्या पानांना पांढऱ्या कडांची अशी विविधता आढळते. टोपल्यांमध्ये लावण्यासाठी फर्नचा वापरही छान होतो. बारीक, नक्षीदार पानांची पोपटी रंगांची फर्न्स बाल्कनीला तजेला देतात. फर्नला सावली आवडत असल्याने पोर्चमध्ये, कमी उन्हाच्या बाल्कनीत जरूर लावावीत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा