पुणे: नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या सर्व्हरमधील तांत्रिक अडचणींमुळे पुन्हा ऑनलाइन भाडेकराराचे (लिव्ह ॲण्ड लायसन्स) दस्त नोंदविण्यात समस्या येत आहेत. गेल्या महिन्यातही अशाच अडचणी आल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला होता.राज्यातील ग्रामीण भागातून आणि परराज्यांमधून महानगरांमध्ये नोकरी, शिक्षणानिमित्त येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. या नागरिकांना रहिवास पुरावा, दुचाकी किंवा चारचाकी वाहन खरेदी, शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेशासाठी, गॅस नोंदणी, पारपत्र, विवाह नोंदणी अशा विविध कारणांसाठी ऑनलाइन भाडेकरार ग्राह्य धरण्यात येतो. आरटीई प्रवेशासाठी अर्ज करायचा असल्यास अर्ज भरण्यापूर्वीचा किंवा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिनांकापूर्वी भाडेकरार नोंदणीकृत असणे शिक्षण विभागाने बंधनकारक केले आहे. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या ऑनलाइन भाडेकराराला कायदेशीर मान्यता असल्याने असा भाडेकरार करण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, राज्यभरात दररोज सुमारे अडीच ते तीन हजार भाडेकरारांची नोंदणी होते. गेल्या महिन्यात नोंदणी विभागाच्या सर्व्हरला तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे त्यांची नोंदणी प्रलंबित होती. राज्यभरात सुमारे ३६ हजारांहून अधिक भाडेकरार दस्त नोंदणीसाठी प्रलंबित होते. मध्यंतरी तांत्रिक अडचणी दूर झाल्यामुळे काही प्रमाणात प्रलंबित दस्तांची नोंदणी टप्याटप्प्याने पूर्ण करण्यात आली. मात्र, पुन्हा सर्व्हरमध्ये अडचणी येऊ लागल्याने हे काम खोळंबले आहे. त्याचा फटका नागरिकांना बसत आहे.

हेही वाचा >>>‘डीआरडीओ’ संचालकाची परदेशात पाकिस्तानी हेरांशी भेट; ‘एटीएस’च्या तपासातील माहिती

विभागाच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे भाडेकराराचे दस्त प्रलंबित राहत आहेत. राज्य सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून ही अडचण दूर करण्याचे काम सुरू आहे. लवकरच पुन्हा सेवा पूर्ववत होईल, असे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून सांगण्यात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Difficulties again in online tenancy deed registration pune print news psg 17 amy