पुणे : देशात सर्कशींमध्ये प्राण्यांचा समावेश करण्यास बंदी असताना पुण्यातील रॅम्बो सर्कसने नामी शक्कल लढवली आहे. सर्कशीमध्ये डिजिटल हत्ती समाविष्ट करण्यात आला असून, कापडी स्वरूपातील अन्य प्राण्यांनाही स्थान देण्यात आले आहेत. डिजिटल स्वरूपातील हत्तीचा समावेश करणारी रॅम्बो सर्कस देशातील पहिली सर्कस ठरली आहे.
काही वर्षांपूर्वीपर्यंत सर्कशीमध्ये प्राणी पाळले जायचे. त्यांचा सर्कशीतील खेळांमध्ये सहभाग असायचा. मात्र, सर्कशीमध्ये प्राण्यांचा वापर करता येणार नसल्याचा नियम लागू झाला. त्यामुळे सर्कशीतील प्राणी सरकारकडे जमा करावे लागले. गेली काही वर्षे प्राण्यांविनाच सर्कशीतील खेळ सादर करण्यात येत होते. या पार्श्वभूमीवर रॅम्बो सर्कसचे मालक सुजित दिलीप यांनी केरळमधील कोईमतूर येथे सहा महिने काम करून डिजिटल हत्ती निर्माण केला आहे. सुमारे ७-८ फूट उंचीचा हा हत्ती चाकांवर ठेवण्यात आला आहे. हत्तीच्या पाठीवर बसलेला सर्कस कलावंत हत्तीला तांत्रिकदृष्ट्या हाताळतो. त्यानुसार हा हत्ती हालचाली करतो. डावीकडे उजवीकडे मान वळवून पाहतो, सोंड उंच करून पाण्याचा फवारा मारतो. डिजिटल हत्तीसह कापडी चिम्पान्झी, जिराफ, झेब्रा हे प्राणी समाविष्ट करण्यात आले असून, लवकरच मोठा कापडी चिम्पान्झी दुबईतून, तर उड्या मारणारा कापडी कांगारू ऑस्ट्रेलियातून आणण्यात येणार आहे.
रॅम्बो सर्कसचे सुजित दिलीप म्हणाले, की बच्चे कंपनीला सर्कशीमध्ये प्राणी आवडतात. मुलांच्या मनोरंजनाचा विचार करून मोटरवर चालणारा हत्ती तयार करण्यात आला. खऱ्या हत्तीसारखा हुबेहूब दिसणारा हा यांत्रिक हत्ती आहे. त्यासाठी पाच लाख रुपये खर्च आला. आणखीही काही प्राणी तयार करण्यात येत आहेत. देशातील कायद्यामुळे सर्कशीत प्राण्यांचा वापर करता येत नाही. युरोपातील सर्कशींमध्ये आजही जिवंत प्राण्यांचा वापर केला जातो.