चिन्मय पाटणकर

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) विविध स्पर्धा परीक्षांच्या पारंपरिक पद्धतीच्या उत्तरपुस्तिकांचे डिजिटल पद्धतीने मूल्यांकन करण्यात येणार आहे. राज्यातील काही विद्यापीठांमध्ये या पद्धतीचा वापर करण्यात येत असून, या पद्धतीमुळे एमपीएससीतर्फे होणाऱ्या परीक्षांच्या निकालाची प्रक्रिया अधिक वेगवान आणि अचूक होऊ शकणार आहे. उत्तरपुस्तिकांच्या डिजिटल मूल्यांकनासाठी एमपीएससीकडून निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या निविदा प्रक्रियेतून पात्र कंपनीची निवड करून आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे उत्तरपुस्तिकांच्या डिजिटल मूल्यांकनाची पद्धती अवलंबण्यात येईल. सद्यःस्थितीत पारंपरिक उत्तरपुस्तिका तज्ज्ञांकडे मूल्यांकनासाठी जातात, त्यानंतर दोन वेळा पुनर्तपासणी करावी लागते. ही प्रक्रिया लाखो उत्तरपुस्तिकांसाठी करावी लागते. उमेदवारांनी पुनर्मूल्यांकनासाठी उत्तरपुस्तिका मागितल्यास त्याच्या छायाप्रती उपलब्ध करून द्यावा लागतात. या प्रक्रियेत एमपीएससीला मोठ्या प्रमाणात वेळ, पैसा आणि मनुष्यबळ खर्च करावे लागते.

हेही वाचा >>> पुणे: पोलीस भरतीची प्रतीक्षा कायम, उमेदवारांमध्ये निराशा

या पार्श्वभूमीवर डिजिटल पद्धतीचा वापर करण्याचा निर्णय एमपीएससीने घेतला. त्यानुसार डिजिटल मूल्यांकन पद्धतीमध्ये उत्तरपुस्तिका स्कॅन करून त्याची पीडीएफ प्रत तयार होईल. त्यानंतर सॉफ्टवेअरमध्ये सर्व माहिती संग्रहित करून ठेवलेली असेल. तज्ज्ञांनी उत्तरपुस्तिका तपासताना काही त्रुटी राहिल्या असल्यास उत्तरपुस्तिकेची तपासणी पूर्ण झालेली नाही हे त्याचवेळी तज्ज्ञांना समजेल. या प्रक्रियेमुळे उत्तरपुस्तिकांचे मूल्यांकन अचूक आणि वेगवान होईल. तसेच उत्तरपुस्तिका पुनर्मूल्यांकनासाठी उमेदवारांनी मागितल्यास त्यांना पीडीएफ प्रत थेट खात्यात उपलब्ध करून दिली जाईल. निविदेची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून ही पद्धती अमलात येईल.

हेही वाचा >>> पुणे राज्यात सर्वांत थंड; ऑक्टोबरमधील दहा वर्षांतील दुसरे नीचांकी तापमान

देशभरातील काही राज्यांचे लोकसेवा आयोग, अनेक विद्यापीठांकडून डिजिटल मूल्यांकन पद्धतीने पारंपरिक स्वरूपाच्या उत्तरपुस्तिकांचे मूल्यांकन करण्यात येते. ही पद्धती एमपीएससीने न स्वीकारल्यास एमपीएससीच्या परीक्षांचे निकाल वेळेत आणि अचूकपणे जाहीर करणे अवघड होत जाईल. त्यामुळे माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर उमेदवारांच्या हितासाठी करण्याच्या दृष्टीने डिजिटल मूल्यांकन पद्धती अवलंबण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचे सकारात्मक परिणाम लगेचच दिसून येतील.

– सुनील अवताडे, सहसचिव, एमपीएससी