दुर्मिळ हस्तलिखिते आणि पोथ्यांचे जतन, प्राचीन पोथ्यांचे प्रकाशन यासाठी गेली सव्वाशे वर्षे कार्यरत असलेल्या आनंदाश्रम संस्थेच्या संग्रहातील १३ हजार ६३२ हस्तलिखितांचे डिजिटलायझेशन पूर्ण झाले आहे. सध्या डीव्हीडीमध्ये संकलित केलेली ही माहिती भविष्यामध्ये संगणकावर नेण्यात येणार असून प्राच्यविद्याज्ञानाचा हा खजिना अभ्यासकांसाठी खुला होणार आहे.
आनंदाश्रम संस्थेच्या संग्रहामध्ये गेल्या १२५ वर्षांमध्ये १४ हजार ६५० हस्तलिखितांचे संकलन करण्यात आले आहे. त्यापैकी ताडपत्रावर असलेल्या हस्तलिखितांचा अपवाद वगळता उर्वरित १३ हजार ६३२ हस्तलिखितांच्या डिजिटलायझेशनचे काम पूर्ण झाले आहे. विविध २६ विषयांचा अंतर्भाव असलेल्या हस्तलिखितांच्या १३ लाख ४० हजार पानांचे डिजिटलायझेशन करण्यात आले आहे. त्यासाठी दिल्ली येथील ‘नॅशनल मिशन फॉर मॅन्युस्क्रिप्ट’ या संस्थेने पुढाकार घेतला. या संस्थेमार्फत आनंदाश्रमातील ९० टक्के हस्तलिखितांच्या डिजिटलायझेशनचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित १० टक्के हस्तलिखितांच्या डिजिटलायझेशनच्या खर्चाचा भार संस्थेने उचलला असल्याची माहिती आनंदाश्रम संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त वसंत आपटे यांनी दिली. डिजिटलायझेशन करताना हस्तलिखिते डीव्हीडी माध्यमामध्ये साठवून ठेवण्यात आली आहेत. २८० डीव्हीडींमध्ये हा साठा संकलित झाला आहे. आता आश्रयदात्यांकडून संस्थेला देणगी मिळाल्यावर अद्ययावत संगणकावर ही माहिती नेण्याचा प्रयत्न आहे. एका विषयाची माहिती एकत्रित करणारे सॉफ्टवेअर विकसित करून डीव्हीडीमधील माहितीचा साठा संगणकावर नेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. डीव्हीडीवरून पाहून एखाद्या हस्तलिखिताची झेरॉक्स कॉपी अभ्यासकांना अल्प दरामध्ये उपलब्ध करून देण्यात येते. या माध्यमातून गेल्या वर्षी संस्थेला ३८ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुंबई उच्च न्यायालयात वकील असलेले महादेव चिमणाजी आपटे यांनी १८८८ मध्ये ‘आनंदाश्रम’ संस्थेची स्थापना केली. अप्पा बळवंत चौकामध्ये असलेल्या संस्थेच्या आवारामध्ये शिवमंदिर असून त्याची स्थापना खुद्द आपटे यांनीच केली आहे. ज्येष्ठ साहित्यिक हरि नारायण आपटे हे त्यांचे पुतणे आपटे यांच्यानंतर संस्थेच्या विश्वस्तांमध्ये होते. संस्थेच्या संग्रहामध्ये असलेल्या हस्तलिखितांमध्ये संस्कृत आणि देवनागरी लिपीतील १३ हजार ६३२ हस्तलिखिते आहेत. मराठी, बंगाली, तमीळ, तेलुगू, गुजराती, हिंदूी भाषेतील हस्तलिखितांसह मोडी लिपीतील बखर लिहिलेले हस्तलिखित आहे. याखेरीज विविध भाषांमध्ये लेखन केलेल्या ताडपत्रांचा समावेश आहे. अलंकार साहित्य, उपनिषद, कामशास्त्र, काव्य, महाकाव्य-लघुकाव्य, काव्य-कथा, काव्य-नाटक, काव्य-चंपू, काव्य-मुक्तक संग्रह, कोष, छंद, जैन, ज्योतिष, ज्योतिष (गणित), धर्मशास्त्र, स्मृति, नीती, न्याय, पुराणेतिहास रामायण, महाभारत, गीता, भागवत, अन्य पुराण, मंत्रतंत्र, मीमांसा, याज्ञिक, योगशास्त्र, वेद, वेदांग, वेदान्त, वैद्यकशास्त्र, व्याकरण, शिल्प-वास्तू, श्रौत, संगीत, सांख्य, स्तोत्र आणि स्मृतिग्रंथ अशा विविध २६ विषयांमध्ये ही हस्तलिखिते विभागली गेली आहेत, असेही आपटे यांनी सांगितले.

Story img Loader