यापूर्वी केंद्र आणि राज्य सरकारमार्फत राबवण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांचा संपूर्ण फायदा दलालांमुळे नागरिकांपर्यंत पोहोचत नव्हता. दलाल या योजनांचा निधी लुबाडत असत. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये लोकसहभागामुळे या योजना नागरिकांपर्यंत यशस्वीपणे पोहोचल्या आहेत. त्यामुळे दलालीला बऱ्याच प्रमाणात आळा बसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते बुधवारी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या अनुगामी लोकराज्य महाभियान (अनुलोम) विभागाच्या कार्यक्रमात बोलत होते.
या मेळाव्याचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह, महापौर मुक्ता टिळक तसेच आदी मान्यवरही उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शासनाच्या प्रत्येक योजनेचा फायदा नागरिकापर्यंत जात असून जनताच त्याची खरी लाभार्थी आहे. डिजिटायझेशनमुळे दलालांना चाप बसला. भविष्यात याचा अधिक फायदा नागरिकांना होण्यासाठी प्रशासनातील आधिकाऱ्यांना पुढाकार घेऊन काम करण्याची गरज आहे. तर राज्यात अराजकीय संस्था म्हणजे हे अनुलोम काम करीत आहे. त्यांनी अनेक शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहचवण्याचे काम केले आहे. नागरिक, संस्था आणि प्रशासन एकत्र आल्याने राज्यात जलयुक्त शिवार ही योजना यशस्वी झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.