पुणे : ‘तांत्रिक दुरुस्ती सुरू आहे, परवानगीच मिळालेली नाही, काम लवकरच सुरू होईल, आठवड्यात उद्घाटन होईल,’ अशी वेगवेगळी कारणे दिल्यानंतर अखेर सात महिन्यांनी पुणे विमानतळाच्या दुसऱ्या टर्मिनलवरील ‘डिजियात्रा’ सुविधेचा मुहूर्त साधला गेला आहे.
विमान प्रवाशांची विमान उड्डाणापूर्वी होणारी दमछाक, सेवा सुरू करण्यासाठी वारंवार करण्यात येणारी मागणी आणि प्रवाशांच्या गैरसोयीबाबत तक्रारींचा पाऊस पडल्यानंतर केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते या सुविधेचे शनिवारी (८ फेब्रुवारी) उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी भाजपचे कार्याध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, प्रदेश महामंत्री राजेश पांडे, स्वरदा बापट, लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालक संतोष ढोके, विमान कंपन्यांचे पदाधिकारी, केंद्रीय औद्याोगिक सुरक्षा बलाचे (सीआयएसएफ) अधिकारी, जवान आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १० मार्च २०२४ ला लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नवीन टर्मिनलचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. या वेळी विमानप्रवाशांना कमी वेळेत सुविधा मिळावी, म्हणून ‘डिजियात्रा’ सुविधेच्या अनुषंगाने पूर्ण तयारी केली गेली होती. मात्र, तांत्रिक कारणास्तव आणि परवानगीअभावी ही सुविधा गेल्या सात महिन्यांपासून प्रतीक्षेत होती. त्यामुळे प्रवाशांना जुन्याच टर्मिनलवरून प्रवेश दिला जात होता. जुन्या टर्मिनलवर ‘डिजियात्रा’ सुरू असली, तरी तेथे प्रवाशांच्या रांगा लागत होत्या. इतरही अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या.
काय आहे डिजियात्रा ?
डिजियात्रा ही बायोमेट्रिक-आधारित सेल्फ-बोर्डिंग प्रणाली आहे. विमानतळावरील प्रवेशद्वारापासून विमानात बसण्यापर्यंतच्या सर्व प्रक्रिया या प्रणालीमुळे वेगात पूर्ण होतात. ‘फेशियल रेकग्निशन’ तंत्रज्ञानाच्या वापरामुळे ती सुरक्षित आहे. प्रवाशांना ‘डिजियात्रा’ अॅपमध्ये एकदा पूर्ण माहिती भरावी लागणार आहे. त्यानंतर अत्याधुनिक कॅमेरे आणि स्कॅनरच्या माध्यमातून प्रवाशाची ओळख पटवून प्रवाशाला आत प्रवेश मिळेल.
देशातील २४ विमानतळांवर ‘डिजियात्रा’ सुविधा सुरू असून, आत्तापर्यंत ४ कोटी प्रवाशांनी सुविधेचा फायदा घेतला आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव कागदपत्रांच्या तपासणीसाठी लागणारा कालावधी बंद झाल्याने प्रवाशांना विमानतळावर सहज प्रवेश करता येणार आहे.- मुरलीधर मोहोळ, केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री