पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन टर्मिनलवरील ‘डिजियात्रा’ सुविधेला सहा महिन्यांनंतर मुहूर्त लागला आहे. ८ फेब्रुवारीपासून सुविधा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे आता हवाई प्रवाशांना दिलासा मिळणार असून, प्रवासापूर्वी तपासणीसाठी (चेक इन) लागणारा कालावधी कमी होणार आहे. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत या सेवेला सुरुवात केली जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डिजियात्रा सेवा पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जुन्या टर्मिनलवर कार्यान्वित होती. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० मार्च २०२४ रोजी दृकश्राव्य माध्यमातून विमानतळाच्या नव्या टर्मिनलचे उद्घाटन केले. नव्या टर्मिनलमधून प्रवासी वाहतूक एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरू होईल, अशी अपेक्षा होती, परंतु प्रत्यक्षात १४ जुलै २०२४ पासून प्रवासी वाहतूक सुरू झाली. या टर्मिनलवरील ‘डिजियात्रा’ सुविधेची परवानगी आणि तांत्रिक बाबींमध्ये प्रक्रिया रखडली होती. त्यामुळे जुन्याच टर्मिनलवरून प्रवाशांच्या बोर्डिंगची तपासणी करून प्रवेश दिला जात होता. परिणामी, प्रवाशांची गर्दी होऊन विमानतळावर रांगेत थांबावे लागत होते. प्रवाशांना विलंब होत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या.

मोहोळ म्हणाले, ‘पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचा कायापालट होत असून, हे विमानतळ अधिकाधिक अद्यायावत सुविधांनी युक्त करण्यासाठी विविध पातळ्यांवर काम सुरू आहे. डिजियात्रा प्रणाली कार्यान्वित करणे हा त्याचाच एक भाग आहे. या सुविधेमुळे बोर्डिंग पास मिळविण्यासाठीच्या रांगा टाळता येणार आहे. सहज आणि कमी वेळेत बोर्डिंग पास उपलब्ध होणार आहेत.’

‘देशभरात १ डिसेंबर २०२२ पासून डिजियात्रा सेवेला सुरुवात करण्यात आली आहे. या अंतर्गत ८० लाखांहून अधिक प्रवासी जोडले गेले आहेत. तसेच, ४ कोटींहून अधिक वेळा प्रवास या सेवेतून झाला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस या डिजियात्राचे वापरकर्ते वाढत आहेत. पुणे विमानतळावरुन प्रवास करणाऱ्या डिजियात्री वापरकर्त्यांची संख्या अधिक असल्याने याचा फायदा पुणेकर विमान प्रवाशांना होणार आहे,’ असेही केंद्रीय मोहोळ यांनी सांगितले.