पुणे : बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय तथा ससून सर्वोपचार रुग्णालयातील गैरप्रकाराचे वाभाडे विधानसभेत गुरुवारी काढण्यात आले. महाविद्यालयातील रॅगिंग प्रकरण आणि डॉक्टरांच्या मद्य पार्टीसह इतर मुद्द्यांवर सरकारला विचारणा करण्यात आली. याप्रकरणी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची कोंडी करण्यात आली.
बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील क्ष-किरणशास्त्र आणि बधिरीकरणशास्त्र विभागातील पदव्युत्तरचे शिक्षण घेणाऱ्या दोन महिला निवासी डॉक्टरांनी रॅगिंगची तक्रार अधिष्ठात्यांकडे केली होती. याबाबत आमदार रवींद्र धंगेकर आणि आमदार अश्विनी जगताप यांच्यासह इतर आमदारांनी प्रश्न विचारला होता. यावर मंत्री मुश्रीफ यांनी खुलासा केला. या तक्रारी रॅगिंग स्वरुपाच्या नव्हत्या. आपापसातील गैरसमजुतीमुळे या तक्रारी करण्यात आल्याचे संस्थावर नेमलेल्या चौकशी समितीने नमूद केल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा – पुण्यात झिकाचा धोका वाढला! ग्रामीण भागातही शिरकाव; जाणून घ्या कुठे वाढताहेत रुग्ण…
ससून रुग्णालयात निवासी डॉक्टरांनी ३१ डिसेंबरला मद्य पार्टी केली होती. त्या वेळी त्यातील काही डॉक्टरांनी मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घालत निवासी महिला डॉक्टरांच्या खोलीच्या दरवाजाची काच फोडली होती. खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविद्यालयात झालेल्या जाहीर कार्यक्रमात त्या पार्टीची छायाचित्रे दाखविली होती. त्या वेळी मंत्री मुश्रीफही उपस्थित होते. दोषी निवासी डॉक्टरांना सहा महिन्यांसाठी वसतिगृहातून निलंबित करण्यात आल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. याचबरोबर त्यांच्याकडून भविष्यात असा प्रकार घडणार नाही, असे हमीपत्र लिहून घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा – पुणे : शहरात महायुतीमध्ये तिढा, शिवसेनेकडून तीन विधानसभा मतदारसंघांवर दावा
वैद्यकीय अधीक्षक बदलावर मौन
रुग्णालयात सातत्याने गैरप्रकार घडत असून, अंतर्गत राजकारण वाढले आहे. याबाबत अनेक वेळा सरकारकडे तक्रारी करूनही कारवाई झालेली नाही. याचबरोबर गेल्या वर्षभरात रुग्णालयात चार वेळा वैद्यकीय अधीक्षक बदलण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यावर हे खरे आहे, एवढेच उत्तर देऊन इतर मुद्द्यांवर मंत्र्यांनी मौन धारण केले. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण विभागातील अंतर्गत राजकारणावर कारवाई करण्याची सरकारच्या पातळीवरच इच्छाशक्ती नसल्याची चर्चा रंगली आहे.