पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी दिलीप काशिनाथ काळभोर यांची, तर उपसभापतीपदी लोणीकंद येथील रवींद्र नारायण कंद यांची बिनविरोध निवड झाली आहे. काळभोर यांची दुसऱ्यांदा सभापतीपदी निवड झाली आहे.
सभापती आणि उपसभापतीपदाच्या निवडीसाठी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केटयार्ड येथील कार्यालयात सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक बोलविण्यात आली होती. जिल्हा उपनिबंधक (ग्रामीण ) तथा निवडणुक निर्णय अधिकारी प्रकाश जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या निवडणुकीसाठी सभापतीपदासाठी दिलीप काळभोर आणि उपसभापदासाठी रवीद्र कंद यांंचे उमेदवारी अर्ज आले. निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश जगताप यांनी काळभोर आणि कंद यांची अनुक्रमे सभापती आणि उपसभापती बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
हेही वाचा >>> पुणे : विमाननगर भागात आयटी बिझनेस हबमध्ये आग; दोन हजार कर्मचारी सुरक्षित
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक प्रदीप कंद, संचालक विकास दांगट, बाजार समितीचे संचालक रोहिदास उंद्रे, प्रशांत काळभोर, सुदर्शन चौधरी आदी या वेळी उपस्थित होते. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या अठरा जागांसाठी नुकतीच निवडणूक झाली होती. निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे प्रदीप कंद आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विकास दांगट यांच्या नेतृत्वाखालील अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीने १३ जागांवर विजय मिळवला तर राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित अण्णासाहेब मगर सहकार पॅनेलचे दोन उमेदवार निवडून आले होते. व्यापारी- अडते आणि हमाल-मापाडी गटातुन तीन उमेदवार निवडून आले, व्यापारी अडते संघातून गणेश घुले, अनिरुद्ध भोसले तसेच हमाल मापाडी मधून संतोष नांगरे यांची संचालकपदी निवड झाली होती.