पुणे : ‘मंत्री धनंजय मुंडे यांना कोणत्याही यंत्रणेने गुन्हेगार ठरविलेले नाही. त्यामुळे त्यांनी राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही,’ असे स्पष्ट करून राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे आमदार, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुंडे यांची पाठराखण केली. नैतिकतेच्या मुद्द्यावर त्यांनी राजीनामा द्यावा की नाही, हे त्यांनाच विचारा, असेही वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे संबंध असल्याचा आरोप करून मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून सातत्याने होत आहे. या पार्श्वभूमीवर वळसे पाटील यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.

हेही वाचा >>> “असंविधानिक पदनिर्मितीत महाराष्ट्र सर्वांत पुढे”, खासदार सुप्रिया सुळे यांची टीका

वळसे पाटील म्हणाले, ‘मुंडे यांना कोणत्याही यंत्रणेने न्यायालयात गुन्हेगार ठरविलेले नाही. न्यायालयाने काही निर्णय दिला असता तर राजीनामा देणे योग्य ठरले असते. चौकशी यंत्रणा आहे. या घटनेच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली ही समिती आहे. त्यामुळे या चौकशीतून सर्व सत्य बाहेर येईल.’

हेही वाचा >>> पुणे : नाट्यगृहांत चित्रपट संकल्पनेला प्रेक्षकांचे बळ

रायगड आणि नाशिक जिल्ह्यातील पालकमंत्रिपदाच्या नियुक्तीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली आहे. त्यासंदर्भात बोलताना वळसे पाटील म्हणाले, ‘अशा गोष्टी घडत असतात. त्यातून एकत्र बसून सर्व नेते मार्ग काढतील,’

बीडचे पालकमंत्रिपद अजित पवार यांच्याकडे आल्याने बीडमधील गुन्हेगारांना शंभर टक्के शिक्षा होईल, असा दावाही त्यांनी केला. सन २०१९ मधील पहाटेचा शपथविधी हे अजित पवार यांच्या विरोधातील षड्यंत्र होते. ते कोणी रचले, ते माहीत नाही. मात्र, सन २०१९ मध्ये बैठका सुरू असताना मल्लिकार्जुन खरगे आणि शरद पवार यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर शरद पवार रागावून बाहेर गेले होते, असे विधान राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केले होते. त्यासंदर्भात बोलताना वळसे पाटील म्हणाले, ‘त्या बैठकीला मी नव्हतो. छगन भुजबळ नाराज असून, ते वेगळ्या वाटेवर आहेत, असे मला वाटत नाही. त्यांच्या काही भावना असतील, तर वरिष्ठ नेते त्यांच्याबरोबर नक्की चर्चा करतील.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dilip walse patil back dhananjay munde over resignation issue in sarpanch santosh deshmukh murder case pune print news apk 13 zws