माजी विधानसभा अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील यांची रविवारी पुण्यात एका कार्यक्रमात भाषण सुरू असताना प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना सुरुवातीला भारती विद्यापीठ रुग्णालयात, तर नंतर रुबी हॉल रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी स्पष्ट केले. दरम्यान, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी तातडीने रुग्णालयात येऊन वळसे-पाटील यांच्या तब्येतीची चौकशी केली.
पवार यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात दुपारी वळसे-पाटील भाषणासाठी उभे राहिले. पवार यांच्या आठवणी सांगत असताना अचानक ते स्तब्ध झाले. काही वेळ तसेच थांबून त्यांनी भाषण अध्र्यावरच सोडले व खुर्चीत बसत असता कोसळले. त्यामुळे व्यासपीठावर धावपळ उडाली. जवळच असलेल्या अजित पवार यांनी त्यांना सावरत खाली झोपविले व तातडीने भारती विद्यापीठ रुग्णालयात दाखल केले. तेथून त्यांना रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आले.
वळसे-पाटील यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याची शक्यता सुरुवातीला व्यक्त करण्यात येत होती. मात्र, तपासणीमध्ये डॉक्टरांनी तसे काही नसल्याचे स्पष्ट केले. ‘‘हृदयाच्या कप्प्यात बिघाड घडून आल्यामुळे त्यांना हृदयाचे ठोके अनियमित होण्याचा (व्हेंट्रिक्युलर टॅकीकार्डिया) त्रास झाला. त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे,’’ असे रुबी रुग्णालयाचे प्रमुख हृदयरोगतज्ज्ञ डॉ. परवेझ ग्रँट यांनी सांगितले.
भारती विद्यापीठ ते रुबी १४ मिनिटांत!
दिलीप वळसे-पाटील यांना भारती विद्यापीठ रुग्णालयातून रुबी हॉलमध्ये तातडीने हलविण्याचा निर्णय झाल्यानंतर रस्त्यावरील वाहतूक हा प्रमुख अडथळा होता. त्यामुळे वाहतूक शाखेची मदत घेण्यात आली. पोलिसांनी वळसे-पाटील असलेल्या रुग्णवाहिकेला ग्रीन कॉरेडॉर उपलब्ध करून दिला. दुपारी ३ वाजून १० मिनिटांनी रुग्णवाहिका निघाली. भापकर चौक, मार्केट यार्ड, डायस प्लॉट, ढोले पाटील चौक, संत कबीर चौक, पॉवर हाऊस चौक, पोलीस आयुक्तालय, अलंकार चौक आदी ठिकाणची वाहतूक थांबविण्यात आली व त्यामार्गे रुग्णवाहिका दुपारी ३ वाजून २४ मिनिटांनी म्हणजे अवघ्या १४ मिनिटांत रुबीमध्ये पोहोचली. पोलीस उपायुक्त सारंग आवाड यांच्या नेतृत्वाखाली सहा अधिकारी व ३५ कर्मचाऱ्यांची याचे नियोजन केले.