पुणे : भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहायक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिशा भिसे यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाकडून उपचारासाठी पैशांची अडवणूक केल्याने गर्भवती तनिशा यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप कुटुंबियांकडून करण्यात आला आहे.

या घटनेची माहिती माध्यमातून समोर आल्यानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाबाबत संतप्त प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर रुग्णालयाच्या पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

तर आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पुणे शहरातील ठाकरे गटाचे आणि शिंदे गटाचे पदाधिकारी आमनेसामने येत,रुग्णालय प्रशासनाने विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत कारवाईची मागणी केली.

त्या आंदोलनादरम्यान दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याडकीकर प्रसार माध्यमांसमोर भूमिका मांडण्यास आले होते.त्यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिरीष याडकीकर यांच्या तोंडावर चिल्लर फेकल्याची घटना घडली. तर ही घटना थांबत तोवर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बोर्डला पतितपावन संघटनेकडून काळे फासून निषेध नोंदविण्यात आला आहे.