पुण्यात तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मागच्या आठवड्यापासून चर्चेत आहे. पुण्यातील नामांकित रुग्णालय अशी ओळख असलेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर या प्रकरणी हलगर्जीपणाचा आरोप होतो आहे. रुग्णालयाने उपचारांसाठी १० लाख रुपये अनामत रक्कम मागितली, ती न दिल्याने उपचारांना उशीर झाला आणि तनिषा भिसे दगावल्या असा आरोप होतो आहे. या प्रकरणानंतर महाराष्ट्रात राजकारण तापलं आहे. दरम्यान या प्रकरणाच्या चौकशीसाठी आरोग्य विभागाच्या समितीचा अहवाल समोर आला आहे. या अहवालात नेमकं काय म्हटलं आहे? आपण जाणून घेऊ.

तनिषा भिसे यांच्या मृत्यूप्रकरणी आरोग्य विभागाची समिती

तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली होती. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात जेव्हा त्यांना आणलं गेलं तेव्हा अनामत रक्कम (डिपॉझिट) १० लाख रुपये द्या अशी मागणी करण्यात आली. ती न भरल्याने आणि उपचार सुरु न केल्याने रुग्ण तनिषा यांना आधी सूर्या रुग्णालय आणि त्यानंतर मणिपाल रुग्णालय या ठिकाणी नेण्यात आलं. मणिपाल रुग्णालय या ठिकाणी त्यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणाच्या चौकशीसाठी उपसंचालक, आरोग्य सेवा, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती नेमण्यात आली.

अहवालात काय म्हटलं आहे?

ईश्वरी भिसे (तनिषा) या नावाने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्या नावाची नोंद आहे. सूर्या रुग्णालय आणि मणिपाल रुग्णालय या ठिकाणी आधार कार्डनुसार नाव मोनाली गणेश रुद्रकर असं आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने आधारकार्ड, गॅझेटची खात्री करुन नोंद करणं आवश्यक होतं पण तसं केल्याचं दिसून येत नाही. भिसे या २०२० पासून वेळोवेळी उपचार व सल्ला घेण्यासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात येत होत्या.

२०२२ मध्ये इश्वरी भिसेंच्या ओव्हरीज काढल्या

२०२२ मध्ये दीनानाथ रुग्णालयात दोन्ही बीजाशयाच्या कर्करोगासाठी ईश्वरी भिसे दीनानाथ रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. त्यांना याच रुग्णालयात ५० टक्के चॅरीटीचा आर्थिक लाभ देऊन त्यांची शस्त्रक्रिया कऱण्यात आली होती. त्यावेळी त्यांच्या ओव्हरीज काढण्यात आल्या होत्या.२८ मार्च २०२५ ला सकाळी ९ वाजता रुग्ण इश्वरी त्यांचे पती आणि नातेवाईक डॉ. घैसास यांना फोन करुन एक दिवसापूर्वी रक्तस्त्राव होत असल्याने बाह्यरुग्ण विभागात उपचारांसाठी आले होते.

साडेपाच तास ईश्वरी भिसे उपचारांविना

डॉ. घैसास, डॉ. रुचिका कांबळे आणि श्रीमती रसिका सावंत यांनी तपासणी केली आणि तनिषा यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. अर्भक कक्षातील शिल्पा कलानी यांची भेटही करुन देण्यात आली. कमी वजनांची सात महिन्यांची जुळी मुले, जुन्या आजाराची गुंतागुंत आणि कमीत २ ते अडीच महिने एनआयसीयू विभागात उपचार करावे लागतील हे समजावून सांगण्यात आलं आणि यासाठी १० ते २० लाख रुपये खर्च लागेल याची कल्पना देण्यात आली. तोपर्यंत त्यांना बाह्यरुग्ण विभागातील बेडवर विश्रांती आणि देखभालीसाठी ठेवण्यात आलं होतं. रुग्ण तनिषा यांच्या नातेवाईकांनी तुम्ही त्यांना दाखल करुन घ्या पैशांच्या व्यवस्थेसाठी प्रयत्न करत आहोत असं सांगितलं. सदरील माता अतिजोखमीची माता होती. तसंच रुग्णालयात आल्यानंतर त्यांचा रक्तदाबही वाढला होता. त्यामुळे रुग्णाला दाखल न करुन घेतलं गेल्याने रुग्ण दुपारी २.३६ च्या सुमारास उपचारांविना निघून गेल्याचं दिसून आलं.

बॉम्बे पब्लिक ट्र्रस्ट कायदा १९५० मधील स्कीम ३ चा भंग

हे धर्मादाय रुग्णालय अधिकृत असून डॉ. घैसास, डॉ. रुचिका कांबळे, डॉ. शिल्पा कलानी,श्रीमती रसिका सावंत, श्रीमती मिनाक्षी गोसावी, श्रीमती माधुरी पणसीकर, श्रीमती शिल्पा बर्वे, श्री सचिन व्यवहारे आणि रवि पालवकेकर यांच्यापैकी एकाही डॉक्टर किंवा कर्मचारी यांनी धर्मादाय योजनेच्या अंतर्गत पात्र असताना रुग्णालयात दाखल करुन घेतलं नाही हे स्पष्ट होतं. बॉम्बे पब्लिक ट्र्रस्ट कायदा १९५० मधील स्कीम ३ चा भंग करण्यात आल्याचं दिसून आलं.

साडेपाच तास रुग्ण असल्याचं रुग्णालय अहवालातही नमूद

रुग्णालायच्या खुलाशानुसार सदर रुग्ण साडेपाच तास रुग्णालयात होता, डॉक्टरांना कल्पना न देता निघून गेला असे नमूद केलं आहे. मात्र शुश्रुषागृहांनी रुग्णाच्या आर्थिक क्षमतेचा विचार न करता गंभीर रुग्णांना प्राथम्याने मुलभूत जिवीत रक्षण सेवा देतील आणि त्यानंतर आजारासंबंधी वैद्यकीय टिपणीसह लवकरात लवकर अशा रुग्णालयाला नजीकच्या संदर्भ रुग्णालयात संदर्भित करतील अशी तरतूद आहे. तरीही असं काही झाल्याचं दिसून आलं नाही.

प्राथमिक चौकशीनंतरचे निष्कर्ष

१) ४ एप्रिल २०२५ ला राज्यस्तरावरुन नियुक्त कऱण्यात आलेल्या समितीने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला भेट दिली. तनिषा भिसे (आधार कार्डानुसार नाव-मोनाली गणेश रुद्रकर) यांच्या मृत्यूबाबतची चौकशी केली. यामध्ये डॉ. घैसास, डॉ. रुचिका कांबळे व श्रीमती रसिका सावंत यांनी तपासणी केली आणि रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. तसंच नवजात अर्भक कक्षातील डॉ. शिल्पा कलानी यांची भेट करुन देण्यात आली. कमी वजनाची, ७ महिन्यांची जुळी मुलं, जुन्या आजारांची गुंतागुंत व कमीत कमी दोन ते अडीच महिने एनआयसीयू उपचार लागतील हे सांगितलं आणि १० ते २० लाख रुपये खर्च लागेल अशीही कल्पना दिली. त्यावर रुग्णाला दाखल करुन घ्या आम्ही पैशांच्या व्यवस्थेसाठी प्रयत्न करत आहोत असं सांगितलं. सदर रुग्णालय हे धर्मदाय रुग्णलाय अधिकृत असून डॉ. घैसास, डॉ. रुचिका कांबळे डॉ. शिल्पा कलानी,श्रीमती रसिका सावंत, श्रीमती मिनाक्षी गोसावी, श्रीमती माधुरी पणसीकर, श्रीमती शिल्पा बर्वे, श्री सचिन व्यवहारे आणि रवि पालवकेकर यांच्यापैकी एकाही डॉक्टर किंवा कर्मचारी यांनी धर्मादाय योजनेच्या अंतर्गत पात्र असताना रुग्णालयात दाखल करुन घेतलं नाही हे स्पष्ट होतं. याबाबत बॉम्बे पब्लिक ट्रस्ट अॅक्ट १९५० मधील स्कीम क्रमांक ३ नुसार ज्यावेळी तातडीची वेळ असते त्यावेळी रुग्णाला आधी दाखल करुन घेणं आवश्यक असतं. हा नियम सुश्रुषागृहे, धर्मदाय रुग्णालयांना लागू होतो. मात्र या ठिकाणी रुग्णालयाने या नियमाचा भंग केला आहे असं दिसून येतं. याबाबत धर्मादाय आयुक्तांनी कारवाई करावी अशी शिफारस आम्ही करत आहोत.

२) रुग्णालायच्या खुलाशानुसार सदर रुग्ण साडेपाच तास रुग्णालयात होता, डॉक्टरांना कल्पना न देता निघून गेला असे नमूद केलं आहे. मात्र शुश्रुषागृहांनी रुग्णाच्या आर्थिक क्षमतेचा विचार न करता गंभीर रुग्णांना प्राथम्याने मुलभूत जिवीत रक्षण सेवा देतील आणि त्यानंतर आजारासंबंधी वैद्यकीय टिपणीसह लवकरात लवकर अशा रुग्णालयाला नजीकच्या संदर्भ रुग्णालयात संदर्भित करतील अशी तरतूद आहे. तरीही असं काही झाल्याचं दिसून आलं नाही. त्यामुळे रुग्णालयाने अॅक्टमधील तरतुदीचा भंग केला असल्याने नियमानुसार वैद्यकीय अधिकारी, पुणे महापालिका यांनी शुश्रुषागृह नोंदणी २०२१ यांना कारवाई करण्यासाठी शिफारस करण्यात येते आहे.

३) सदर मृत्यू हा माता मृत्यू असल्याने याबाबत सखोल चौकशी माता मृत्यू अन्वेषण समिती मार्फत करण्यात येत असून सगळ्या बाबींची सखोल चौकशी करुन अहवाल आणि मात मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल यावरुन निष्कर्षांसह अंतिम अहवाल तयार करण्यासाठी काही कालावधी लागणार आहे, तो अहवालही लवकरच सादर केला जाईल.