पुणे : उल्कापात होऊन डायनासोर नामशेष झाल्याचे जगभरात मानले जाते. मात्र, ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भारतातील डायनासोर नामशेष झाल्याचे पुरावे आढळून आले असून, बेडूक, पाली, सरडे अशा प्रजातींची जैवविविधता वाढल्याचे या संशोधनातून स्पष्ट झाले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, पंजाबमधील भटिंडा येथील केंद्रीय विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केलेल्या संयुक्त संशोधनाचा शोधनिबंध ‘हिस्टॉरिकल बायोलॉजी’ या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झाला आहे. संशोधनात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अनूप ढोबळे, ज्येष्ठ पुराजीवशास्त्रज्ञ डॉ. धनंजय मोहबे, डॉ. सतीश सांगोडे, डॉ. बंदना सामंत, दीपेश कुमार यांचा सहभाग होता. २०१९ ते २०२४ या सहा वर्षांमध्ये डेक्कन पठाराच्या उत्तरेकडील भाग, म्हणजे ‘माळवा प्लॅटू’ परिसरात सखोल अभ्यास करण्यात आला. त्यात एकूण १५ ठिकाणी लाव्हामुळे तयार झालेल्या खडकांच्या अंतर्गत भागातील जीवाश्मांचा अभ्यास करण्यात आला.
हेही वाचा – Pune Water planning : पालकमंत्री नसल्याने पाणी नियोजन लांबणीवर
संशोधनाबाबत माहिती देताना अनुप ढोबळे म्हणाले, की ज्वालामुखीचा उद्रेक होऊन माळवा प्लॅटू तयार होण्यासाठी १.०६ दशलक्ष वर्षे लागली. माळवा प्लॅटू हा सर्वांत जुना लाव्हा मानला जातो. ज्वालामुखीच्या उद्रेकापूर्वीच्या काळात डायनासोर, मगरी, कासवे यांचे अस्तित्व होते. ज्वालामुखीच्या उद्रेकाचा जैवविविधतेवर काय परिणाम याचा या संशोधनासाठी अभ्यास करण्यात आला. त्यानुसार ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर बेडूक, पाली, सरडा अशा प्रजातींची जैवविविधता वाढल्याचे निदर्शनास आले. तर मगरी, कासवे अशा प्रजाती परिस्थितीला तोंड देत टिकून राहिल्या. मात्र, डायनासोरच्या सोरोपॉड आणि थेरोपॉड या प्रजाती नामशेष झाल्या. ज्वालामुखीचा उद्रेक सुरू झाल्यावर थेरोपॉड ही प्रजाती संपुष्टात आली. तर सोरोपॉड काही काळ टिकून राहिले. भारुडपुरा येथे सोरोपॉडचे अस्तित्व आढळून आले. मात्र, त्यानंतरच्या काळात झालेल्या हवामान बदलांनी ही प्रजातीही नामशेष झाली. त्यामुळे ज्वालामुखी हे भारतातील डायनासोर संपण्याचे कारण मानता येते.
सुमारे ६६.०५ दशलक्ष वर्षांपूर्वी ‘मास एक्स्टिंन्शन’ झाल्याचे मानले जाते. मात्र, ६६.३५२ दशलक्ष वर्षांपूर्वीपर्यंत भारतातील डायनासोर अस्तित्वात होते, असेही या संशोधनातून दिसून आल्याचे ढोबळे यांनी नमूद केले.
हेही वाचा – पुणे : मोशीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र कचऱ्याच्या विळख्यात
सापाच्या लांबीवर परिणाम
ज्वालामुखी उद्रेकपूर्व काळात याच भागात सापाची एक प्रजाती अस्तित्वात असल्याचे निदर्शनास आले. त्या सापाची लांबी चार मीटरपर्यंत होती. मात्र, उद्रेकाचा परिणाम या प्रजातीवर होऊन ही प्रजाती कमी झाल्याचे, तसेच या सापाच्या लांबीवरही परिणाम होऊन ती कमी झाल्याचे पुराव्यांनुसार दिसते, असेही ढोबळे यांनी सांगितले.