तंत्रनिकेतन आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील तसेच पदव्युत्तर विज्ञान शाखेतील व कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ‘डिपेक्स’ प्रदर्शन व स्पर्धा हे एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरले आहे. तंत्रज्ञानाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध प्रकल्प अभ्यासात सादर करावे लागतात. या प्रकल्पांसाठी त्यांना गुणही मिळतात; परंतु नुसते गुण प्राप्त करणे हा या प्रकल्पनिर्मितीमागचा हेतू राहू नये, तर असे प्रकल्प उद्योजक, व्यावसायिक, नागरिक यांच्यासमोर स्पर्धेच्या, प्रदर्शनाच्या रूपाने यावेत, त्यातून ते करणाऱ्यांना नवी क्षितिजे खुली व्हावीत, त्यातून उद्योजक तयार व्हावेत, यासाठी ‘डिपेक्स’चे आयोजन केले जाते. यंदा पुण्यात सुरू असलेल्या ‘डिपेक्स’चे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे.
पंचवीस वर्षांपूर्वी सांगलीत युवा वर्षांच्या निमित्ताने सुरू झालेल्या या उपक्रमाने आज भव्य स्वरूप धारण केले आहे. सुरुवातीला एका जिल्ह्य़ापुरत्या मर्यादित असलेल्या ‘डिपेक्स’मध्ये आज राज्यातील सत्तावीस जिल्ह्य़ांतील दोनशेपेक्षा अधिक महाविद्यालयांमधून दोन हजारांवर विद्यार्थी सहभागी होतात आणि त्यांचा तंत्रकौशल्याचा आविष्कार प्रतिवर्षी घडवतात. ‘डिपेक्स’ ही संधी आहे विद्यार्थ्यांना स्वत:ला सिद्ध करण्याची, तंत्रज्ञान ही एक शक्ती आहे की, ज्याच्यामुळे एखादी समस्या सुटू शकते हा विश्वास समाजाला देण्याची आणि स्वत:च्या विचारशक्तीलाही चालना देण्याची. ‘डिपेक्स’मधील उद्योजक व विद्यार्थी भेटीमुळे तंत्रज्ञान विकासाला एक नवी दिशा प्राप्त होते, असा अनुभव आहे आणि तरुण विद्यार्थ्यांना व्यवसायाची संधी देखील ‘डिपेक्स’मुळे उपलब्ध होते. या संधीचे सोने करण्याची ताकद तंत्रनिकेतन-अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांमध्ये आहे आणि त्याचे कृतिशील आश्वासन समाजाला देण्याची संधी म्हणजे ‘डिपेक्स’.
हा नुसता विद्यार्थ्यांचा वार्षिक मेळा नाही. ‘डिपेक्स’मध्ये प्रकल्प सादर करायला मिळणे हा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणािबदूही ठरतो असा अनुभव आहे. विद्यार्थी परिषदेने या उपक्रमामागे संघटनेचे मोठे बळ उभे केले आहे. राज्य शासनासह अनेक मान्यवर संस्था-संघटनांनी या उपक्रमाला पाठबळ दिले आहे. त्यामुळेच या उपक्रमाची आश्वासकताही सिद्ध झाली आहे. विद्यार्थी परिषदेचा हा एक यशस्वी उपक्रम तर ठरला आहेच, शिवाय भविष्यात ‘डिपेक्स-सृजन’ हे उद्योजक विकासाचे अधिक सक्षम केंद्र होईल, असा विश्वास ‘डिपेक्स’च्या रौप्यमहोत्सवी आयोजनाच्या निमित्ताने निश्चितपणे व्यक्त करावासा वाटतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा