माझ्या महापौरपदाच्या कालखंडात अभिनयसम्राट दिलीपकुमार आणि ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानू यांचा महापालिकेतर्फे सत्कार करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी आलेल्या दांपत्यासमवेत महापौर या नात्याने मी दिवसभर होते. कलाकार असले, तरी ती आपल्यासारखी माणसेच आहेत. रुपेरी पडद्यावरील अभिनय पाहिला अशा कलाकारांमधील माणूस मला या निमित्ताने जवळून अनुभवता आला. हा माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे की जो मी कधीच विसरू शकणार नाही.
राजकारणातील माझा प्रवेश नंतर झाला असला, तरी युवा कार्यकर्ती म्हणून ‘महिला उन्नती केंद्र’ या संस्थेच्या माध्यमातून मी सामाजिक कार्यामध्ये सहभाग घेत होते. संस्थेच्या काही कार्यक्रमांना मीरा कलमाडी यांना प्रमुख पाहुण्या म्हणून निमंत्रित केले होते. १९९२ मध्ये महिलांसाठी राजकारणात ३३ टक्के आरक्षण लागू झाले, त्या वेळी मला उमेदवारीसाठी विचारणा झाली होती. मात्र, कौटुंबिक कारणांमुळे मी नकार दिला होता. मात्र, सामाजिक कार्य करताना राजकारणाच्या माध्यमातून त्याला व्यापक स्वरूप देता येईल, या भूमिकेतून मी १९९७ मध्ये नगरसेवकपदासाठी तयार झाले. आपटे रस्ता, प्रभात रस्ता असा भाग असलेल्या जंगली महाराज मंदिर या वॉर्डातून मला उमेदवारी मिळाली होती. या भागातून ४० वर्षे भारतीय जनता पक्षाचा उमेदवार विजयी होत होता. पतितपावन संघटनेचे शिवाजीराव चव्हाण यांच्या पत्नी शारदा चव्हाण भाजपतर्फे निवडणुकीच्या िरगणात होत्या. मात्र, अनपेक्षित रीत्या माझा विजय झाला.
महापालिकेच्या २००२ मध्ये झालेल्या निवडणुकीत माझ्यासह अनिल भोसले आणि बाळासाहेब बोडके असे तिघांचे पॅनेल विजयी झाले. निवडून आल्यानंतर लगेचच मला पुण्याच्या महापौरपदाची संधी मिळाली. माझ्या कारकीर्दीत महात्मा फुले स्मारक, सावित्रीबाई फुले स्मारक आणि कोरेगाव पार्क येथील मौलाना अबुल कलाम आझाद स्मारकाचे काम सुरू झाले. ही स्मारके साकारण्यास विलंब झाला असला, तरी त्याची पायाभरणी माझ्या कारकीर्दीत झाली होती. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांसाठी दोन चटई क्षेत्र निर्देशांक देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे या क्षेत्रामध्ये पुण्याने स्वतंत्र स्थान निर्माण केले. महापालिका आयुक्तांना निवासस्थान होते. मात्र, महापौरांना निवासस्थान नव्हते. वास्तविक देशातील महापालिकांचीच नव्हे तर, परदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी महापौरांना भेटायला येत असतात. त्यांना निमंत्रित करायचे तर महापौरांनाही निवासस्थान असले पाहिजे या भूमिकेतून घोले रस्त्यावर महापौर निवासस्थान बांधण्यात आले. घोले रस्त्यावर पं. जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक केंद्र साकारण्यात आले. या कामगिरीची दखल घेऊन मला विधान परिषदेवर संधी दिली.
दीप्ती चवधरी
- दीप्ती चवधरी दोनदा नगरसेविका राहिल्या असून २००२ ते २००५ या कालावधीत त्यांनी पुण्याचे महापौरपद भूषविले. जून २०१० पासून सहा वर्षे त्यांनी विधान परिषदेच्या आमदार म्हणूनही काम केले.