लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: शाळेत तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ आणि मद्य बागळणे, सेवन करण्यावर बंदी घालण्यात आली असून, असे करताना आढळल्यास जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून कारवाई करण्यात येणार आहे.
शिक्षक भरती आणि शिक्षक बदल्यांसंदर्भात शालेय शिक्षण विभागाने शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. त्यात शाळेत तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ आणि मद्य बंदी, कारवाईबाबत स्पष्टता देण्यात आली आहे.
हेही वाचा… पुणे : परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीसाठी ५ जुलैपर्यंत मुदतवाढ
शिक्षण सेवक कालावधी पूर्ण झाल्यावर सेवेचे आणि वर्तनाचे मूल्यमापन करण्यासाठी मूल्यमापन चाचणी घेण्यात येईल. वर्तनात कसूर केल्याचे आढळल्यास सुधारणा करण्याबाबत नोटिस दिली जाईल. सुधारणा न झाल्यास सहा महिन्यांसाठी जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेत पाठवण्यात येईल. त्यानंतर सुधारणा न झाल्यास ५० टक्के वेतनावर पुन्हा प्रशिक्षणासाठी पाठवले जाईल. त्यानंतरही सुधारणा न झाल्यास सक्षम प्राधिकाऱ्यामार्फत कारवाई करण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.