पुणे : राज्यात अनेक डॉक्टर बेकायदा पद्धतीने औषधांचा साठा करून त्याची विक्री करीत असल्याची तक्रार औषध विक्रेता संघटनेने केली आहे. यानंतर अन्न व औषध प्रशासनाने औषधांचा अतिरिक्त साठा करणाऱ्या आणि विक्री करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेला डॉक्टरांनी विरोध केला असून, अन्न व औषध प्रशासनाकडून नाहक त्रास दिला जात असल्याचा दावा केला आहे.
डॉक्टरांना थेट औषध विक्री करण्यास परवानगी नाही. असे असूनही अनेक डॉक्टर रुग्णांना औषधांची विक्री करतात. या औषधांची किंमत ते उपचाराच्या शुल्कात समाविष्ट करतात. याचा फटका औषध विक्रेत्यांना बसत आहे. यामुळे राज्यातील औषध विक्रेता संघटनेने अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन अन्न व औषध प्रशासनाने डॉक्टरांकडील औषधांचा साठा तपासण्याची मोहीम हाती घेतली आहे.
हेही वाचा – कारण राजकारण : कोल्हापूरच्या चंद्रकांतदादांना कोथरूड पुन्हा मानवेल?
अन्न व औषध प्रशासनाने डॉक्टरांसाठी परिपत्रक काढले आहे. त्यात म्हटले आहे की, डॉक्टर मोठ्या प्रमाणात औषधांचा साठा करून विक्री करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. औषधे व सौंदर्य प्रसाधने नियम १९४५ च्या अनुसूची क चे सर्रास उल्लंघन डॉक्टरांकडून होत आहे. त्यामुळे या महिन्यात १४ तारखेपर्यंत डॉक्टरांची तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. अन्न व औषध प्रशासनाने प्रत्येकी १० डॉक्टरांची तपासणी करावी आणि याबाबतचा अहवाल सादर करावा.
नेमका वाद काय?
डॉक्टरांनी औषधांचा किती साठा ठेवावा, याबद्दल कोणताही स्पष्ट नियम नाही. ते रुग्णांना औषधे देऊ शकतात, मात्र त्याची विक्री करू शकत नाहीत. मात्र रुग्णांच्या गरजेनुसार ते औषधे ठेवू शकतात. रुग्णालय असल्यास तिथे औषध विक्रीचे दुकान असते. छोट्या डॉक्टरांच्या दवाखान्यात अशी व्यवस्था नसते. हे डॉक्टर औषध विक्री करीत असल्याने व्यवसायाला फटका बसत असल्याचा औषध विक्रेत्यांचा आरोप आहे. यावरून अन्न औषध प्रशासनाने डॉक्टरांची तपासणी मोहीम हाती घेतल्याने वाद निर्माण झाला आहे.
डॉक्टर त्यांच्याकडील रुग्णांसाठी पुरेशी औषधे ठेवू शकतात. कोणताही डॉक्टर गरजेशिवाय अतिरिक्त औषधांचा साठा करीत नाही. डॉक्टरांनी औषधांचा साठा किती ठेवावा, याला कायदेशीर मर्यादा नाही. अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणी मोहिमेमुळे विनाकारण डॉक्टरांना त्रास देण्याचा प्रकार सुरू आहे. – डॉ. संजय पाटील, अध्यक्ष, हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडिया (पुणे शाखा)
कायद्यातील पळवाटेचा डॉक्टरांकडून गैरफायदा घेतला जात आहे. डॉक्टरांकडून औषध विक्री सुरू असल्याने औषध विक्रेत्यांच्या व्यवसायाला फटका बसत आहे. डॉक्टरांना औषधांची विक्री करायची असेल तर त्यांनी औषध विक्रेता नेमून कायदेशीर पद्धतीने ती करावी. – अनिल बेलकर, सचिव, केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट
डॉक्टर औषधांचा साठा करीत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. अद्याप डॉक्टरांवर कारवाई करण्यात आलेली नाही. एखाद्या डॉक्टरकडे औषधांचा मोठा साठा असल्याची माहिती मिळाल्यास कारवाई करण्यात येईल. – गिरीश हुकरे, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग