पुणे : पुण्यातून कर्नाटकमधील हुबळी शहरासाठी थेट विमानसेवा ५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्यामुळे, पुण्यातून भारतातील आणखी एक नवे शहर विमानसेवेने जोडले जाणार आहे. पुणे ते हुबळी हा विमानप्रवास एक तासाचा असेल. इंडिगो कंपनीकडून ही सुविधा देण्यात येणार आहे.
पुण्याहून हुबळी आणि हुबळीतून पुण्यासाठी आठवड्यातून दोनदा म्हणजेच, शनिवार आणि रविवारी दोन्ही बाजूने विमान उपलब्ध असणार आहे.
पुण्याहून हुबळीसाठी रात्री ८.०५ वाजता, तर हुबळी विमानतळावरून पुण्यासाठी संध्याकाळी ६.३० वाजता विमान उड्डाण घेईल. हुबळी हे कर्नाटकातील एक महत्त्वाचे शहर आहे. हातमागावरील कापड आणि लोखंडासह कापसाचे केंद्र म्हणूनही हे शहर प्रसिद्ध आहे. उंकल तलाव, नृपतुंगा हिल, उत्सव रॉक गार्डन, श्री चंद्रमौलेश्वर स्वामी गुडी मंदिर आणि इंदिरा गांधी ग्लास हाऊस गार्डन आदी या शहरातील आकर्षणाची केंद्र आहेत.
हेही वाचा – पुणे : नवउद्यमींना सर्वतोपरी मदत, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही
हेही वाचा – गृहमंत्र्यांनी केवळ बोलण्यापेक्षा कारवाई करावी, अजित पवार यांचा फडणवीसांना टोला
इंडिगोच्या ग्लोबल सेल्सचे प्रमुख विनय मल्होत्रा म्हणाले, की हुबळी आणि पुणे दरम्यान नवीन विमानसेवेमुळे नागरिक दोन्ही शहरांशी सहज जोडले जातील. सध्या रस्ते मार्गाने किंवा रेल्वेने हा प्रवास ८-११ तासांचा आहे. हुबळी धारवाड हा भारतातील सर्वाधिक वेगाने वाढणारा प्रदेश आहे आणि हवाई जोडणीची या भागात मोठी मागणी होती, ती आम्ही पूर्ण करीत आहोत.