पुणे : भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांनी खासगी मोटारीवर अंबर दिव्याचा केलेला वापर, खेडकरांच्या आईने शेतकऱ्याला पिस्तुलाचा दाखविलेला धाक आणि त्यांनी मिळवलेले दिव्यांग प्रमाणपत्र या सर्व प्रकारांचा अहवाल पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी मागविला आहे.

हेही वाचा >>> पूजा खेडकर यांच्या गैरवर्तणुकीचा आता इंग्रजी भाषेत अहवाल; खेडकर यांचा खुलासाही घेण्याची केंद्र सरकारची सूचना

पोलीस महासंचालक कार्यालयाकडून या प्रकरणाचा अहवाल मागविण्यात आला आहे. शेतकऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखविल्याप्रकरणी मनोरमा खेडकर यांच्याविरुद्ध पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खेडकर यांच्याकडे शस्त्र परवाना आहे. त्यांनी अटी आणि शर्तींचा भंग केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. त्यांना याबाबत खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. योग्य तो खुलासा न केल्यास कायदेशाीर कारवाई करण्यात येईल. मोटारीवर अंबर दिवा लावल्याप्रकरणी मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

हेही वाचा >>> पूजा खेडकरने ‘वायसीएम’ रुग्णालयातून अंपगत्वाचे प्रमाणपत्र घेतल्याचे उघड

खेडकर यांनी भारतीय लोकसेवा आयोगाची परीक्षेत पात्र होण्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र सादर केले होते. त्यांनी वेगवेगळी दिव्यांग प्रमाणपत्रे मिळविल्याचे आरोप करण्यात आला होता. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी दिव्यांग संघटनेने राज्य अपंग कल्याण आयुक्त डाॅ. प्रवीण पुरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. याबाबत दिव्यांग संघटनेकडून अपंग कल्याण आयुक्तांना तक्रार अर्जही देण्यात आला होता. संबंधित प्रकरण गंभीर स्वरुपाचे आहे. अशा गैरप्रकारांमुळे पात्र दिव्यांग उमेदवार सुविधांपासून वंचित राहतात, याकडे लक्ष वेधण्यात आले होते. त्यानंतर डाॅ. पुरी यांनी संंबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी सूचना केली. संबंधित तक्रार अर्ज दिव्यांग कल्याण आयुक्तांकडून पुणे पोलिसांना देण्यात आला आहे. याबाबतचा तपास आणि चौकशी पुणे पोलिसांकडून सुरू करण्यात आली आहे. खेडकर यांना दिव्यांग प्रमाणपत्र कोणी दिले, याची चौकशी सुरू करण्यात आली आहे, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले.

Story img Loader