पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन येणाऱ्या नागरिकांशी सौजन्याने वागावे. प्रत्येकाची तक्रार ऐकून तक्रारींंचे निराकरण करावे, असे आदेश पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी शुक्रवारी दिले.शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील वास्तू तसेच आवारातील पूर्व प्राथमिक प्रियदर्शिनी पब्लिक स्कूलच्या इमारतीचे नूतनीकरण करण्यात आले आहे. पोलीस महासंचालक सेठ यांच्या हस्ते नूतनीकरणाचे उद्घाटन झाले, या प्रसंगी ते बोलत होते. राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (प्रशासन) अनुपकुमार सिंह, अतिरिक्त पोलीस महासंचालक (राज्य राखीव पोलिस दल) चिरंजीव प्रसाद, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर, राजेंद्र डहाळे, नामदेव चव्हाण, प्रियदर्शनी पब्लिक स्कूलचे कार्यकारी अधिकारी राजेंद सिंग, मुख्याध्यापक अर्पिता दीक्षित आदी या प्रसंगी उपस्थित होते.
हेही वाचा >>>थंडीच्या हंगामात मुंबईत उन्हाचा चटका ; तापमानवाढ आणखी आठवडाभर
पोलीस कायदा-सुव्यवस्था सांभाळतात. त्यांचा नागरिकांशी थेट संपर्क येतो. पोलिसांनी नागरिकांशी सौजन्याने वागावे. पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारी नीट ऐकून घ्याव्यात. नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करणे हे पोलिसांचे काम आहे. तक्रारदाराला चांगली वागणूक देणे गरजेचे आहे,असे पोलीस महासंचालक सेठ यांनी नमूद केले. पोलीस दलातील प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात यावी. पोलीस वसाहतीत योग्य त्या सुविधा पुरवाव्यात. पोलीस ठाण्यांपासून जवळच्या ठिकाणी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निवासस्थाने उपलब्ध करून द्यावीत. गणेशाेत्सवात पुणे पोलिसांनी बंदोबस्त योग्यरीत्या पार पाडला. उत्सवाच्या कालावधीत अनुचित प्रकार पडला नाही, असे त्यांनी सांगितले. पोलीस आयुक्त गुप्ता यांनी प्रास्ताविक केले. सहपोलीस आयुक्त कर्णिक यांनी आभारप्रदर्शन केले.
हेही वाचा >>>वसंत मोरे : जनतेच्या मनातील नेता
सायबर गुन्ह्यांची दखल
सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढते आहे. सामान्य नागरिक चोरट्यांच्या बतावणीला बळी पडतात. सायबर गुन्हे रोखण्यासाठी नागरिकांमध्ये जागृती करणे गरजेचे आहे. पुणे-मुंबई शहरात सायबर गुन्ह्यांची संख्या वाढती असून वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर सायबर गुन्हे विभागात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हे उघडकीस आणावेत, अशा सूचना पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी केल्या.