पुणे: अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणात पुणे पोलिसांनी रोझरी स्कूलचा संचालक विनय अरहाना अटक केली आहे. अरहाना याने ललित पाटीलला ससून रुग्णालयातून पसार होण्यास मदत केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.अरहाना याला तळोजा कारागृहातून ताब्यात घेण्यात आले आहे. आज, गुरुवारी त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. एका बँकेकडून घेतलेल्या कर्ज प्रकरणात फसवणूक केल्या प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) अरहानाला काही महिन्यांपूर्वी अटक केली होती. सध्या तो तळोजा कारागृहात आहे. तेथून त्याला ताब्यात घेण्यात आले.
ललित पाटील ससून रुग्णालयातून पसार झाल्याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ गुन्हे शाखेच्या पथकाने दोन कोटी रुपयांचे मेफेड्रॉन पकडले होते. या प्रकरणात ललित पाटील सामील असल्याचे तपासात उघडकीस आले होते. ससून रुग्णालयातून ललित पसार झाला. ललितला पसार होण्यास कोणी मदत केली याचा तपास करण्यात येत होता. तपासात विनय याचा मोटार चालक दत्ता डोके याला अटक करण्यात आली होती. त्याने ललितला ससून रुग्णालयातून पसार झाल्यानंतर मोटारीतून बाहेर सोडले होते. तसेच त्याच्याकडून दहा हजार रुपये घेतले होते. ललितची मैत्रीण प्रज्ञा कांबळे आणि अर्चना निकम यांना अटक करण्यात आली होती. ललित रुग्णालयात असताना तो बाहेर फिरत असल्याचे दिसून आले होते. त्याची अनेकांनी भेट घेतली होती. दरम्यान विनय अऱ्हाना याचा चालक डोके याच्याकडे पोलिसांनी तपास केला असता विनय या गुन्ह्यात सामील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.