“देवाच्या दर्शनासाठी तिकिट आणि अधिक पैसे देणाऱ्या भाविकांना आधी दर्शन असे उपक्रम राबविणारे धार्मिक क्षेत्रातील लोकच अधिक नास्तिक आहेत,” असे मत प्रसिद्ध दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी धार्मिकतेच्या नावाखाली टाकून देण्याची मूल्येच आपण पुढे घेऊन जात आहोत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. ते रविवारी (२४ एप्रिल) पुण्यात शहीद भगतसिंग विचारमंचातर्फे आयोजित नास्तिक मेळाव्यात बोलत होते. सामाजिक कार्यकर्ते असीम सरोदे, लेखक तुकाराम सोनवणे यावेळी उपस्थित होते. य. ना. वालावलकर अध्यक्षस्थानी होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुनील सुकथनकर म्हणाले, “कला क्षेत्रात तर अंधश्रद्धेचा सुकाळ आहे. मी स्वतःला नास्तिक मानत असलो, तरी चित्रीकरणापूर्वी पूजा करणाऱ्यांच्या भावना दुखावू नये ही सहिष्णुता माझ्याकडे आहे. बहुसंख्यांच्या धर्माला प्रश्न विचारतात म्हणून डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या केली गेली. वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्याला नको आहे का? जो अधिक पैसे देतो त्याला आधी दर्शन दिले जाते हे न समजणाऱ्या देवाला असहाय्य कोणी केले? धर्म, देव आणि सणसमारंभ आपण काढून कसे टाकणार?”

“चिकित्सा आणि प्रश्न विचारण्याची ताकद फक्त नास्तिकतेतून येते”

“चिकित्सा आणि प्रश्न विचारण्याची ताकद फक्त नास्तिकतेतून येते. वैचारिकदृष्ट्या स्वतंत्र माणूस खरा साहिष्णुभाव जपू शकतो. धर्मासाठी ‘गर्व से कहो’ म्हणणार असाल तर मी तुम्हाला विरोध करेन ही भूमिका घ्यावी लागेल,” असं मत सुनील सुकथनकर यांनी व्यक्त केलं.

“धर्माची चिकित्सा केल्याने तुकाराम महाराजांपासून नरेंद्र दाभोलकरांपर्यंत अनेकांचे बळी”

लेखक तुकाराम सोनवणे म्हणाले, “धर्मग्रंथांची चिकित्सा करून वैचारिक मांडणी करतो तो नास्तिक. लोंढ्याबरोबर वाहत जातात ते आस्तिक. समाजाच्या प्रवाहाविरुद्ध जाणे म्हणजे नास्तिक. धर्माची चिकित्सा केली म्हणून तुकाराम महाराज, नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी, गौरी लंकेश यांचा बळी गेला.”

“दुसऱ्याच्या घरासमोर बसून हनुमान चालीस म्हणण्याचा दुराग्रह का?”

सामाजिक कार्यकर्ते असीम सरोदे म्हणाले, “दुसऱ्याच्या घरासमोर बसून हनुमान चालीस म्हणण्याचा दुराग्रह का? यात देव-धर्म नाही, तर राजकारण आहे. तुम्ही आस्तिक किंवा नास्तिक यापैकी एकाच बाजूचे असले पाहिजे हा आग्रह बुद्धिप्रामाण्यवादी विचारांपासून फारकत घेणारा आहे.”

“देव-धर्म न मानण्याचा अधिकार प्रत्येक माणसाला आहे”

“देव-धर्म न मानण्याचा अधिकार प्रत्येक माणसाला आहे, असा निर्णय मुंबई उच न्यायालयाने दिला आहे. आस्तिक आहे हे दाखवण्याचा राजकारणाचा बदललेला प्रवाह घटनाविरोधी आहे, असं नागरिकांनी स्पष्टपणे सांगितले पाहिजे,” असंही असीम सरोदे यांनी नमूद केलं.

हेही वाचा : अग्रलेख : नास्तिकांची नालस्ती

“काळानुसार प्रगत होत जाण्याची बुद्धी नसणे म्हणजे अस्तिकता”

य. ना. वालावलकर म्हणाले, “काळानुसार प्रगत होत जाण्याची बुद्धी नसणे म्हणजे अस्तिकता. निरीश्वरवादी लोकांची संख्या वाढत आहे. मंगल- अमंगल, पवित्र-अपवित्र काही नसते. तर, चांगले किंवा वाईट असते.”

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Director sunil sukathankar comment on atheist people in religious world in pune print news pbs