केंद्रीय महसुल गुप्तचर संचलनालय (डीआरआय) विशेष पथकाने पुण्यातील वडगाव शेरी भागात असलेल्या एका बंगल्यावर छापा टाकून १९ परदेशी पक्ष्यांची सुटका केली. या कारवाईत फिलिपाईन्स, इंडोनिशेया, आफ्रीका, दक्षिण अमेरिकेतील विविध प्रजातींच्या पक्ष्यांची सुटका करण्यात आली. डीआरआयच्या पथकाकडून जप्त करण्यात आलेले पक्षी पुढील संगोपनासाठी कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयाच्या व्यवस्थापनाकडे सुपूर्द करण्यात आले आहेत.


वडगाव शेरी भागातील रहिवासी डोमॅनिक सिक्वेरा यांच्या बंगल्यात परदेशातून तस्करी करून आणलेले पक्षी ठेवण्यात आले असल्याची माहिती डीआरआयच्या पुणे विभागाच्या पथकाला मिळाली होती. डीआरआयच्या पथकाने सोमवारी सिक्वेरा यांच्या बंगल्यात छापा टाकला. त्यांच्या निवासस्थानातून आफ्रिका खंडात आढळणारे १५ लव्हबर्ड, दक्षिण अमेरिका, फिलिपाईन्स तसेच इंडोनियाशात आढळणारे पक्ष्यांची सुटका करण्यात आली, अशी माहिती डीआरआयच्या पुणे विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. याप्रकरणी सिक्वेरा यांच्याविरोधात भारतीय वन्यजीव कायदा आणि भारतीय सीमा शुल्क कायद्यााअंतर्गत (कस्टम) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परदेशातून तस्करी करून आणलेले अनेक शोभीवंत पक्षी अनेकजण हौसेने पाळतात. तस्करी करून आणलेले शोभीवंत पक्षी पाळणे गुन्हा आहे. सिक्वेरा यांच्या बंगल्यातून सुटका करण्यात आलेले १९ पक्षी संगोपनासाठी राजीव गांधी प्राणी संग्रहालयात संगोपनासाठी सोपविण्यात आले आहेत.

डीआरआयच्या पथकाने कोलाकात्यादेखील अशीच कारवाई केली असून या कारवाईत तेथून ३५ परदेशी शोभीवंत पक्षी ताब्यात घेतले आहेत. परदेशातून परदेशातील पक्ष्यांची भारतात मोठ्या प्रमाणावर तस्करी करण्यात येत आहे. दरम्यान, मुंबईत काही दिवसांपूर्वी डीआरआयकडून करण्यात आलेल्या कारवाईत कासवे जप्त करण्यात आली होती.